नाशिक : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक भागात नागरिक मास्क परिधान करत नसल्याने अखेरीस प्रशासन व लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागले. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतर आता महापौर सतीश कुलकर्णीदेखील रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत.
महापौर कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. २०) शालिमार, सीबीएस, भद्रकाली, मेन रोड, बोहोरपट्टी, रविवार कारंजा, सरकारवाडा, जुने नाशिक, चौक मंडई, बागवानपुरा, कथडा आदी भागांचा दौरा केला. फळ, भाजी तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांना महापौर कुलकर्णी यांनी मास्क घालण्याचे आवाहन करताना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेची पाहणी केली. औषध फवारणीच्या सूचना दिल्या. रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर तसेच शासनाने घालून दिलेले जे नियम आहेत, ते पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, पश्चिमच्या जयश्री सोनवणे, भद्रकाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक साजन सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा