आयुष्मान कार्ड : जनआरोग्याचे 25 टक्के लाभार्थी धनाढ्य

anchor www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : अ‍ॅड. देवयानी ढोन्नर
त्र्यंबकेश्वरनगर परिषदेने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी कार्डवाटप सुरू केले आहे. गरिबांसाठी असलेल्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या अवघी 2896 आहे. त्यापैकी 25 टक्के नावे हे प्राप्तीकर भरणार्‍या उच्च उत्पन्न गटातील धनिकांची आहेत. तर उर्वरित 25 टक्के यादीत असूनही सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

तालुक्यातील या योजनेच्या पात्र नागरिकांच्या नावांची यादी कार्यालयात उपलब्ध झाली आहे. त्यामध्ये नाव शोधून त्यानंतर त्याची संगणकीय ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. आधारकार्ड जोडणीसह नोंदणी झाल्यानंतर त्यांना आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे. त्या कार्डाचा वापर पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारासाठी होणार आहे. त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या 15 हजारांच्या आसपास आहे. मात्र, आयुष्मान आरोग्य कवच पात्र लाभार्थ्यांची संख्या अवघी 2896 आहे. त्यापैकी 25 टक्के लाभार्थी नावांचा ठावठिकाणा लागत नाही. तर आणखी 25 टक्के नावे ही प्राप्तीकर भरणारी उच्च उत्पन्न गटातील धनाढ्य आहेत. मागच्या दोन वर्षांपूर्वी आयुष्मान भारत योजनेची यादी आल्यानंतर याचा उलगडा झाला. काही लोकांनी आपले कार्ड खासगी सेवा सुविधा केंद्रावर काढून घेतले. मात्र, अद्यापही बहुतांश कार्ड वितरित झालेले नाहीत. अनेकांना आपले नाव या यादीत आहे, याचा थांगपत्तासुद्धा नाही. शासनाने लाभार्थ्यांचे नावे पाठविलेले पत्रदेखील संबंधितांना पोहोचले नाही. यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातून एकाही लाभार्थीने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, ही माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या पातळीवर पोहोचवली. पंतप्रधानांच्या योजनांचा लाभ पोहोचत नसल्याचे लक्षात आल्याने नगर परिषद आयुष्मान कार्ड वितरित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

इमारत मालक यादीत….
लाभार्थ्यांच्या नावाची यादी चाळली असता प्राप्तीकर भरणारे, इमारतींचे मालक असलेले तसेच ज्यांची दररोजची कमाई काही हजारांच्या व लाखांच्या घरात आहे, अशा रहिवाशांची नावे मोफत उपचारांच्या यादीत आहेत. तर स्वत:चे घर नाही, रोजंदारी नाही अशा अल्प व अत्यल्प उत्पन्न असलेले नागरिक वंचित आहेत. वास्तविक लाभार्थीचे सर्वेक्षण त्र्यंबक शहरात कधी झाले हे कोणालाही कळले नाही. नगर परिषद कार्यालयात यादी प्राप्त झाल्यानंतर त्याचा उलगडा झाला. खासगी एजन्सीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. त्यांनी जनगणना यादी समोर ठेवून घरबसल्या काम उरकल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्र्यंबक नगरपालिकेत यापूर्वी मालमत्ता कर आकारणीचे सर्वेक्षणही चुकीचे झाल्याने त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.

हेही वाचा:

The post आयुष्मान कार्ड : जनआरोग्याचे 25 टक्के लाभार्थी धनाढ्य appeared first on पुढारी.