Site icon

आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : वैभव कातकाडे
केंद्र सरकारने वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये राज्यात नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी 45 टक्के लाभार्थ्यांनी या योजनेचे आयुष्मान कार्ड घेतले आहे. याबाबतची प्रगती सुधारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी स्पेशल अजेंडा राबविणार आहेत. दि. 15 ते 31 मे दरम्यान जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये लाभार्थ्यांना हे कार्ड वितरीत करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत कार्डवाटपापासून जिल्ह्यातील अनेक लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. ग्रामीण भागातील एकूण 10 लाख 66 हजार 630 लाभार्थ्यांपैकी 5 लाख 18 हजार 602 लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले असून, हे प्रमाण अवघे 49 टक्के आहे. उर्वरित 51 टक्के लक्ष्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे स्पेशल ड्राइव्हचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवार (दि. 15) पासून सुरू होणार्‍या या स्पेशल ड्राइव्हसाठी त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ड्राइव्हमध्ये गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या आपले सरकार केंद्रात लाभार्थ्यांची नोंदणी करणार असून त्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करणार आहेत.

या गंभीर आजारांवर उपचार…
प्रोस्टेट कर्करोग, दुहेरी व्हॉल्व्ह बदलणे, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट, कोविड-19, पल्मोनरी व्हॉल्व्ह बदलणे आदी.

ही आहेत आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये…
1. भारत सरकारने वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनांपैकी ही एक आहे.
2. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक काळजीसाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपये कव्हरेज
3. अंदाजे 50 कोटी लाभार्थी (10 कोटींहून अधिक गरीब आणि असुरक्षित पात्र कुटुंबे) या योजनेस पात्र आहेत.
4. लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.
5. आयुषमान भारत योजनेत (इ-झचग-ध) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल.
6. आयुष्मान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त करू शकेल.
7. आयुष्मान भारत योजनेत जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेत 1,354 पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनरी बायपास, गुडघे बदलणे व स्टेंट लावण्यासारखे उपचारही सामील आहेत.
8. निदान सेवा, औषधे, खोलीचे शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, सर्जन शुल्क, पुरवठा, आयसीयू आणि ओटी शुल्क यांचा समावेश होतो.
9. आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये 1300 हून अधिक वैद्यकीय पॅकेजेससाठी कव्हरेज वाढवले आहे.

हेही वाचा:

The post आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Exit mobile version