नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. याअंतर्गत शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता नाशिक जिल्ह्यात ४४१ शाळांनी नोंदणी केली असून, त्यानुसार चार हजार ४७९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असणार आहेत.
आरटीईअंतर्गत राज्यात सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, लवकरच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने पालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तत्पूर्वी शाळांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत बुधवारी (ता. १०) संपली. सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ४४१ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्यासाठी चार हजार ४७९ जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी
गेल्या वर्षीपेक्षा जागा कमीच
गेल्या वर्षी राज्यभरात नऊ हजार ३३१ शाळांनी नोंदणी करताना एक लाख १५ हजार ४७७ जागा उपलब्ध केल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यंदा राज्यातून सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागा उपलब्ध केल्या आहेत. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या वर्षी सुमारे ४४७ शाळांमधील पाच हजार ३०७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध केल्या होत्या. यंदा जिल्ह्यातील उपलब्ध जागांच्या संख्येतही घट झालेली आहे.
हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट