आरटीईच्या प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ; जिल्ह्यात तीन हजार ६८४ प्रवेश पुर्ण

नामपूर (नाशिक) : यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठ महिन्यांपासून ज्ञानमंदिरांना कुलपे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची मात्रा दिली जात आहे. शाळांचे पहिले सत्र संपले असले तरी राज्यात आरटीईचे प्रवेश सुरूच आहेत.

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४४७ शाळा असून, त्याअंतर्गत पाच हजार ५३७ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १७ हजार ६३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यांपैकी पाच हजार ३०७ जणांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळाला. मात्र त्यातील तीन हजार ६८४ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. 

७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असून, २१ डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. कोरोनाकाळात प्रवेशासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात दिरंगाई झाल्याने डिसेंबरमध्येही आरटीईच्या राज्यात हजारो जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली. प्रवेशावेळी एकावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत सरासरी ७५ टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले होते. त्यामुळे आगामी काळात चौथी फेरीही काढण्यात यावी, अशी पालक व शिक्षणप्रेमींची मागणी होती. 

हेही वाचा>> दुर्दैवी! आई घरात येण्यापूर्वीच सातवीत शिकणाऱ्या 'प्रज्योत'चा खेळ संपला; मातेने फोडला हंबरडा

प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी...

दर वर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते. मात्र प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. यंदा तर तब्बल तीन महिने उशिराने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. त्यामुळेच यंदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडला आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून जूनपूर्वीच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी केली आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

आरटीई प्रवेशाची राज्यातील स्थिती 
* एकूण शाळा ः ९,३३१ 
* एकूण प्रवेशक्षमता ः १,१५,४७७ 
* एकूण अर्जसंख्या ः २,९१,३६८ 
* निवड झालेले : १,३६,२५७ 
* एकूण प्रवेश पूर्ण : ८४,५१७ 
 

आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या शाळांनी विहित पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू करावी. शासन निर्णयानुसार पालकांना तारीख व मोबाईल संदेश पाठवावा. आदेशानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पाहणी करून तातडीने पडताळणी समितीकडे प्रवेश निश्चित करून घ्यावेत. 
-राजीव म्हसकर, 
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नाशिक