आरटीई ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ मार्चपासून; संकेतस्‍थळ, ॲपवर भरता येईल अर्ज

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. या अंतर्गत इच्‍छुक पालकांना आपल्या पाल्यांचा अर्ज येत्‍या ३ ते २१ मार्चदरम्‍यान ऑनलाइन स्‍वरूपात भरता येईल.

काही दिवसांपासून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेंतर्गत शाळांच्‍या नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. यात शाळांना आपल्‍याकडील उपलब्‍ध २५ टक्‍के जागांचा तपशील संकेतस्‍थळावर नोंदवायचा होता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता प्रत्‍यक्ष प्रवेशप्रक्रियेला सुरवात होत आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार ३ मार्चपासून संकेतस्‍थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. संकेतस्‍थळासोबत ॲपद्वारेदेखील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्‍ध असेल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, अंतिम टप्प्‍यात पालकांना प्रत्‍यक्ष शाळेत आवश्‍यक बाबींची पूर्तता करून प्रवेश निश्‍चित करता येईल. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

साडेचार हजार जागा 

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षीच्‍या तुलनेत उपलब्‍ध जागांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली असून, त्यात चार हजार ५४४ जागा उपलब्ध आहेत. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत शाळांच्या संख्येत तीनने वाढ झाली असली, तरी प्रवेशासाठी उपलब्‍ध जागांची संख्या एक हजाराने घटली आहे. राज्‍यातील नऊ हजार ४३१ शाळांनी नोंदणी करताना प्रवेशासाठी ९६ हजार ८०१ जागा उपलब्‍ध असणार आहेत. 

या कागदपत्रांची आवश्‍यकता 

प्रवेशासाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांना रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांची आवश्‍यकता असेल. ही कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर निर्माण केलेल्या पडताळणी समितीकडे तपासली जातील.  

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!