आरटीई प्रवेश निश्‍चितीसाठी २३ पर्यंत मुदतवाढ; अशा आहेत सूचना

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या पंचवीस टक्‍के जागांसाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात, प्रतीक्षायादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तीन हजार ६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित

जिल्ह्यातील ४४७ खासगी शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा उपलब्ध होत्या. यासाठी राबविलेल्या ऑनलाइन प्रक्रियेत १७ हजार ६३० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी निवड यादीत पाच हजार ३०७ जणांच्या नावाचा समावेश होता. प्रवेशाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांकडून होत होती. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजार ६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उर्वरित रिक्‍त जागांवर शालेय स्तरावरील प्रतीक्षा यादीनिहाय प्रवेश दिले जात आहेत. संबंधित पालकांना एसएमएसद्वारे माहिती कळविण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, मेसेजवर अवलंबून न राहाता विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या आधारे लॉग-ईन आयडीचा वापर करून प्रवेशाची स्थिती जाणून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

अशा आहेत सूचना

आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच, प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. तसेच, प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती या टॅबवर क्‍लिक करून करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर यांची प्रिंट काढून शाळेत घेऊन जाण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात