आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल

वाहतूक पोलीस www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंड झालेल्या वाहनधारकांना दंड भरण्याच्या सुविधेसाठी न्यायालयाने दि. 12 नोव्हेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन केले आहे. यामध्ये दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान शहर वाहतूक शाखेने राबवलेल्या आठ दिवसाच्या अभियानात दंड झालेल्या वाहनधारकांकडून पावणे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हाभरात करण्यात आली असून कारवाईअंतर्गतचा दंड भरण्याची सुविधा नजीकच्या पोलीस ठाणे किंवा शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात करण्यात आली आहे. याच संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशाने धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने अभियान राबवण्यात आले. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक महाजन आणि त्यांच्या पथकाने या अंतर्गत आठ दिवसात धुळे शहरातील विविध चौकांमध्ये जनजागरण अभियान राबवले. तसेच मशीनद्वारे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी दि. 1 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर प्रलंबीत असलेल्या 967 चलनांचे 3 लाख 59 हजार 450 रुपये रोखीने तर 136 चलनांचे 1 लाख 14 हजार 450 रुपये क्युआरकोड व एटीएमव्दारे वसुल केले आहे. तसेच ज्या नागरीकांच्या तक्रारी होत्या त्यांच्या तक्रारींचा निपटारादेखील केला आहे.

जिल्ह्यातील ज्या वाहनधारकांनी त्यांचे वाहनांवर प्रलंबीत असलेल्या दंडाची रक्कम अद्यापपावेतो भरलेली नाही. अशा वाहनधारकांना न्यायालयाने दि. 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालतीत हजर राहण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. न्यायालयाची पुढील कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी त्यांचेकडे असलेल्या दंडाची रक्कम शहर वाहतुक शाखा किंवा जवळचे पोलीस स्टेशन येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत भरुन घ्यावी.  वाहनावरील दंडाची रक्कम पाहण्यासाठी मोबाईलवरील महा ट्रॅफिक ॲप या सुविधेचा लाभ घ्यावा. दंडाची रक्कम क्युआर कोड, रोख, एटीएम इत्यादीव्दारे भरता येते. अशी माहिती संजय बारकुंड, पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल appeared first on पुढारी.