आरोग्यदायी सायकलिंगकडे महिलांसह मुलींचाही वाढता कल! 

चांदोरी (जि.नाशिक) : लॉकडाउनच्या शिथिलतेत गर्दी टाळून मुक्त ऑक्सिजनसाठी चांदोरीसह परिसरात सकाळचे फिरणे वाढतेय. 
कोरोना महामारीने व त्यातूनही बदललेल्या जीवनशैलीमुले अलीकडे मोकळ्या हवेत फिरणे, प्राणायाम, योगासने करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भल्या पहाटेपासून सकाळपर्यंत सायकलिंगचे प्रमाणही वाढत आहे. नाशिकजवळील चांदोरी तसेच निफाड तालुक्यातील बहुतेक रस्त्यांमुळे सायकलिंग करणाऱ्या अनेक तरुण व ज्येष्ठांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यातच आता महिला व मुलींचीही सायकलिंगच्या व्यायामात भर पडत आहे. 

सायकल चालविण्याला पुन्हा एकदा प्राधान्य

पूर्वी वाहने कमी होती. त्यामुळे सायकल अधिक प्रमाणात वापरली जायची. आता वाहने भरपूर असूनही पहाटे आरोग्यदायी फिरण्यासाठी व निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त ऑक्सिजन घेत ऍरोबिक व्यायामाचा आनंद लुटण्यासाठी मुली, महिलाही सायकल हाती घेऊ लागल्या ही कौतुकास्पद बाब आहे. त्यातून लयाला गेलेली सायकल दुकाने तालुका पातळीवर पुन्हा कात टाकू लागली आहेत. तालीम, व्यायामशाळा, जिमलाही लॉकडाउनमध्ये खीळ बसली होती. संचारबंदीतून व्यायामाच्या सवयीला लॉकडाउन काळात अनेकांनी मुरड घातली होती. ती सवय आता पूर्व पदावर येत असून, व्यायामासाठी अनेक जण लोकांत मिसळून वेळ घालवण्यापेक्षा बहुउद्देशीय आनंद व फिटनेस पदरी घेण्यासाठी सायकल चालविण्याला पुन्हा एकदा प्राधान्य देत आहेत. त्यातही महिला, मुलींची संख्या लक्षणीय आहे. 
 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पहाटे कमी वर्दळीचे चढ-उताराचे रस्ते अधिक असल्याने सायकलिंगमधून चांगला व्यायाम होतो. - शीतल बांगर, सिद्धपिंप्री 
 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

रोज सायकल चालविणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून, इंधन बचतीबरोबरच वायूप्रदूषणही टाळता येते. त्यामुळे अधिक बचत होते. भौतिक सुखाच्या हव्यासापोटी होणाऱ्या आजारांना सायकल वापराणे रोखता येते. प्रत्येक नागरिकाने आठवड्यातील एक दिवस सायकल वापरावी. - रवींद्र नाईक, 
जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक