आरोग्य उपकेंद्र बनले गोठा अन् तळीरामांचा अड्डा! अभोण्यात रुग्णां आरोग्य रामभरोसे

अभोणा  (जि. नाशिक) : येथील कळवण रस्त्यावरील शास्त्रीनगर परिसरात अनेक वर्षांपासून उभारलेले आरोग्यवर्धिनी आरोग्य उपकेंद्र धूळखात पडले आहे. वापरात नसल्याने मोकाट जनावरांच्या निवाऱ्याचा गोठा अन् तळीरामांचा अड्डा बनला आहे. 

स्थानिक महिलांच्या तक्रारीनुसार येथील उपसरपंच भाग्यश्री बिरारी यांनी या वास्तूची सदस्य व कार्यकर्त्यांसह पाहणी केली. बऱ्याच दिवसांपासून उपकेंद्र वापरातच नसल्याने परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले असून, कंपाउंडचे गेट तुटून पडलेले आहे. शिवाय स्वच्छतागृहाची टाकीही उघडीच आहे. परिसरात दारू व पाण्याचा बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून दिल्याने, कळवण, सुरगाणा व पेठ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यामुळे परिसरातील इतर आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी नांदुरी, कनाशी, कळवण व नाशिक येथे जावे लागते. मोलमजुरी करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या सामान्य रुग्णांना उपचारासाठी इतर केंद्रांवर जाण्याइतपत आर्थिक स्थिती नाही. शिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही कोविडची लस घेण्यासाठी इतर केंद्रांवर कुणाचा तरी आधार घेऊनच जावे लागते. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अनेक वर्षांपासून तयार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हे उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करावे, अशी स्थानिकांनी मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, शंकर पवार, चेतन बिरारी, मनोज वेढणे, राजू पवार, अनिल घोडेस्वार, भरत हिरे, राहुल बिरारी, उशीर वायरमन, सोनल शहा, आकाश कुमावत, प्रशांत जाधव, भय्या हिरे, आबा मुसळे, राकेश वाघ, योगेश सूर्यवंशी, संदीप शहा, भावडू सोनवणे, विक्रम सूर्यवंशी, उमेश दुसाने उपस्थित होते. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

अनेक वर्षांपासून हे उपकेंद्र बांधले असून, त्याचा वापरच होत नाही. सर्वत्र घाणीचेच साम्राज्य पसरले आहे. आरोग्य विभागाने तत्काळ स्वतंत्र पथक नेमून केंद्रात जाण्याचा त्रास कमी करावा, ज्येष्ठ नागरिकांचे कोविड लसीकरणही याच केंद्रात सुरू करावे. 
-भाग्यश्री बिरारी, उपसरपंच, अभोणा