आरोग्य विद्यापीठ कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी १९ नावे निश्‍चित; मेमध्ये निश्‍चिती शक्य 

नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी शोध समितीला ३५ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १९ जणांची नावे मुलाखतीसाठी निश्‍चित केली आहेत. शोध समितीतर्फे पुढील महिन्यात १९ जणांच्या मुलाखतींचा कार्यक्रम निश्‍चित होण्याची शक्यता आहे. या मुलाखतींमधून पाच जणांची यादी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यातून साधारणत: मेमध्ये नवीन कुलगुरूंच्या नावावर राज्यपालांच्या कार्यालयाकडून शिक्कामोर्तब होऊ शकतो. 

कुलगुरुपदासाठी शोध समितीतर्फे मागविण्यात आलेल्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांच्या पडताळणीतून आता १९ जणांची निवड मुलाखतींसाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सैन्यदलाच्या लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, दिल्लीमधील सैन्यदलाचे वैद्यकीय महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. अशोक होओदा, वर्धामधील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे, नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, बारामतीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आणि कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राच्या संचालक डॉ. मनीषा कोठेकर यांच्या नावाचा समावेश आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

याशिवाय मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या इतरांची नावे अशी : मुंबईच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रा. डॉ. दीपक राऊत, पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर, मुंबईच्या एल.टी.एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, नांदेडच्या डॉ. एस.सी.जी.एम.सी.चे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, मिरजच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जयसिंगपूरच्या जे.जे.एम.ए.एम.सी.चे प्राचार्य डॉ. प्रमोद बुद्रुक, गुजरातमधील नूतन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सुभाष खत्री, पुण्याच्या सिंहगड दंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयंत पळसकर, औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ