आरोग्य विभाग रिक्त पदांच्या तापाने फणफणला! यंत्रणेवर ताण 

येवला (जि.नाशिक) : कोरोनाच्या महामारीने वर्षापासून आरोग्य यंत्रणा सेवेत व्यस्त असून, त्यांनी दिलेली सेवा कौतुकास्पदच म्हणावी लागेल. मात्र, असे असले तरी तालुक्यासाठी मंजूर असलेल्या १७१ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १०२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत असलेल्या ६९ जणांवरच मोठा ताण पडत आहे. विशेष म्हणजे तालुक्याला पूर्णवेळ आरोग्य तालुका आरोग्य अधिकारीदेखील नाही. 

आरोग्य विभाग रिक्त पदांच्या तापाने फणफणला! 
चार भागात विस्तारलेल्या तालुक्याची अनेक गावे मराठवाड्यासह निफाड, नांदगाव, कोपरगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोचलेली आहेत. त्यामुळे गावात आरोग्यसेवेसाठी स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा आधार ठरत आहेत. कोरोनाच्या काळात तर शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभागाने केलेले काम कौतुकास्पद आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही बाभूळगाव व नगरसूल येथे कोविड केअर सेंटर चालविले जात असून, तेथे रुग्णसेवा उत्तमरीत्या दिली गेली. किंबहुना तालुका आरोग्य अधिकारी हे महत्त्वाचे पद रिक्त असून, भारम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांच्याकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे. मात्र, त्यांनी या काळात कुठलीही उणीव भासू न देता या पदाला न्याय देत उत्तम सेवा देऊन गैरसोय टाळली. असे असले तरी अनेक महत्त्वपूर्ण पदे रिक्त असल्याने त्यांच्यावर ताण पडत असून, नागरिकांना आरोग्य सेवापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. 

येवल्यात १७१ पैकी तब्बल १०२ पदे रिक्त, यंत्रणेवर ताण 
ग्रामीण भागात भारम, राजापूर येथे भव्यदिव्य आरोग्य केंद्र नव्या इमारती बांधून सुरू झाले. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उणीव भासत असल्याने म्हणावी अशी सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. राजापूरला तर नव्याने इमारत बांधल्यापासून आरोग्य अधिकारी व पुरेसे कर्मचारी नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येकाला १५ ते २० च्या दरम्यान गावे जोडलेली आहे. तर २५ उपकेंद्र शंभरावर गावांसाठी कार्यरत आहेत. मात्र, एवढ्या आरोग्य संस्था असताना चार वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक व सेविका मिळून तब्बल ७० पदे, तर परिचराची १४ पदे रिक्त आहेत. या मुळे आरोग्य यंत्रणेवर नक्कीच मोठा ताण पडत असल्याची स्थिती आहे. शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले असून, याचे नुकतेच पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. येथेही अनेक पदे रिक्त आहेत. 

 

गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाची पदे रिक्त असल्याने आम्ही वारंवार पाठपुरावा करून पदे भरतीची मागणी केली आहे. आरोग्यमंत्र्यांना भेटून पत्रही दिले आहे. तालुक्याला अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने मिळावीत, यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -सुरेखा दराडे, सभापती, आरोग्य व शिक्षण समिती, जिल्हा परिषद नाशिक 

 

आरोग्याच्या पदात समतोलपणा ठेवला पाहिजे. ग्रामीण भागातली जनतेला आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी आरोग्यसेवा परवडत नसल्याने शासकीय आरोग्य केंद्रे आधारवड ठरतात. याचा विचार करून तालुक्यामध्ये २५ उपकेंद्र आहेत व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन आयुर्वेदिक दवाखान्याची सर्व पदे शासनाने लक्ष घालून तत्काळ भरावीत. -प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला 

 

...अशी आहेत रिक्त पदे 
पद मंजूर भरलेली रिक्त 
तालुका आरोग्य अधिकारी १ ० १ 
वैद्यकीय अधिकारी १६ १२ ४ 
आरोग्य पर्यवेक्षक १ ० १ 
औषध निर्माण अधिकारी ६ ३ ३ 
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ ० १ 

आरोग्य सहाय्यक ७ ६ १ 
आरोग्यसेवक ३८ १७ २१ 
आरोग्य सहाय्यिका ६ १ ५ 
आरोग्यसेविका ६१ १३ ४८ 
कनिष्ठ सहाय्यक ७ ३ ४ 
परिचर २७ १३ १४ 
एकूण १७१ ६९ १०२