आवक वाढल्याने कांदा गडगडला! सोशल मीडियातील अफवांमुळे ‘पॅनिक सेल’चा परिणाम

नाशिक : दिवाळीच्या सुट्यांनंतर सोमवारी (ता. २३) कांद्याचे आगर जिल्ह्यातील सर्वदूर बाजारपेठांमधील लिलाव सुरू झाले आणि आवक भरमसाट झाल्याने कांद्याचे भाव क्विंटलला आठशे ते एक हजार रुपयांनी गडगडले. सोशल मीडियातून शहरामध्ये कर्फ्यूची अफवा उठली होती. सोशल मीडियातील अफवांचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचल्याने शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ करणे पसंत केले. 

अफवेमुळे वाढली आवक

नवीन पोळ कांद्याची नियमित आवक सुरू होण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी बाकी आहे. त्याच वेळी आयात केलेला कांदा ग्राहकांप्रमाणे हॉटेल व्यवसायात चवीला पसंत पडला नाही. त्यामुळे नाशिकच्या उन्हाळ कांद्याची चलती राहिली आहे. कांद्याची आयात झाल्यावर काही दिवस भाव कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाव पूर्वपदावर येण्याच्या दिशेने निघाले असताना दिवाळीनिमित्त बाजारपेठांमधील लिलाव बंद झाले. दिवाळी झाल्यावर गेल्या आठवड्यात काही बाजारपेठांमधील लिलाव सुरू झाले. मात्र सोमवारपासून उर्वरित बाजारातील लिलावाची सुरवात झाली. त्याच्या पूर्वसंध्येला आवक वाढण्याच्या अफवेचा खोडसाळपणा सोशल मीडियातून करण्यात आला. त्यामुळे तणावाखाली आलेल्या शेतकऱ्यांनी तिपटीपासून पाचपटीपर्यंत कांद्याची अधिक आवक केली.

बाजारपेठांमध्ये भावात घसरण

पिंपळगाव बसवंतमध्ये शनिवारी (ता. २१) सात हजार १४१ क्विंटल कांद्याची सरासरी चार हजार एक रुपयांनी विक्री झाली होती. सोमवारी २५ हजार ५७१ क्विंटल कांद्याची आवक झाली असली, तरीही सरासरी भाव चार हजार २०० रुपये असा राहिला. शिवाय नवीन लाल पोळ कांद्याला पिंपळगावमध्ये शनिवारच्या तुलनेत २०० रुपयांनी अधिकचा म्हणजे चार हजार ३०० रुपये असा भाव मिळाला. हा अपवाद वगळता इतर बाजारपेठांमध्ये भावात घसरण झाली. लासलगावमध्ये शनिवारी (ता. २१) चार हजार ८४० क्विंटल कांदा चार हजार १५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने, तर सोमवारी नऊ हजार ३५० क्विंटल आवक झालेला कांदा तीन हजार ३०० रुपये या सरासरी भावाने विकला गेला. लासलगावमध्ये ३००, तर मनमाडमध्ये ४०० रुपये क्विंटल अशी नवीन लाल पोळ कांद्याच्या भावात घसरण झाली. बाजारपेठनिहाय नवीन लाल पोळ कांद्याला क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा : लासलगाव- तीन हजार ८००, मुंगसे- तीन हजार ८५०, चांदवड- चार हजार २००, मनमाड- तीन हजार ४००, देवळा- तीन हजार, उमराणे- चार हजार १००. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

 कांद्यासह वाहने परत 

सटाणा : येथील बाजार समिती आवारात सोमवारी १२ हजार ८७० क्विंटल उन्हाळ कांद्याची, तर चार हजार ११० क्विंटल नवीन कांद्याची आवक झाली. गेल्या १२ नोव्हेंबरपासून कांदा लिलाव बंद असल्याने सोमवारी मोठी आवक झाली. वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने काही वाहने कांद्यासह परत गेली. उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी तीन हजार ३५० आणि जास्तीचा चार हजार २१५ रुपये असा भाव मिळाला. नवीन कांदा सरासरी तीन हजार ६५० रुपये आणि जास्तीचा चार हजार ६०० रुपये क्विंटल या भावाने विकला गेला. 

 
सायंकाळनंतरही काटे होते सुरू 

नांदगाव : येथील बाजार समितीत सोमवारी कांद्याची विक्रमी आवक झाली. बोलठाणच्या उपबाजारासह नांदगाव बाजार समितीमधील कांदा आवक एक हजार क्विंटलपर्यंत पोचली. त्यामुळे नांदगावमध्ये सायंकाळपर्यंत काटे सुरू होते. बोलठाण उपबाजारात लिलावाचे एक सत्र झाले. त्यात उन्हाळ कांद्याला ५०० ते तीन हजार ७०० रुपये आणि तीन हजार २०० रुपये सरासरी असा क्विंटलला भाव मिळाला. बोलठाणला पाचशेहून अधिक, तर नांदगावमध्ये नऊ हजारांच्या आसपास वाहनांमधून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. इथे उन्हाळ कांद्याला एक हजार ८०० ते तीन हजार ६१२ आणि सरासरी तीन हजार १०० रुपये क्विंटल असा भाव राहिला. नवीन लाल कांद्याची आवक ५६९ वाहनांतून झाली. त्यास एक हजार ७०० ते चार हजार १०० आणि सरासरी तीन हजार ८०० रुपये क्विंटल सरासरी असा भाव होता. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ आवक (क्विंटल) सरासरी भाव 
येवला ११ हजार ३ हजार ३०० 
मुंगसे ७ हजार ५०० ३ हजार 
कळवण १९ हजार ३०० ३ हजार ७०० 
चांदवड ७ हजार ३ हजार २०० 
देवळा ५ हजार ८५ २ हजार ३०० 
उमराणे १९ हजार ५०० २ हजार ९०० 
मनमाड ५ हजार ५०० २ हजार ९५५