आवक वाढूनही लाल कांद्याला अच्छे दिन! बाजारभाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा

येवला ( जि. नाशिक) : गेल्या सप्ताहापासून खाली आलेले लाल कांद्याचे किमान, कमाल व सरासरी बाजारभाव शुक्रवारी (ता.२९) वधारल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी किमान बाजारभावात २५० रुपये, कमाल बाजारभावात २२० रुपये, तर सरासरी बाजारभावात ३२५ रुपयांनी वाढ झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात चालू सप्ताहातील बुधवारी रांगडा लाल कांद्याला किमान ५०० ते कमाल २६६१ (सरासरी २३००) रुपये बाजारभाव मिळाला होता. बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी हे बाजारभाव वधारले गेले.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

शुक्रवारी लाल कांद्यास किमान ७५० ते कमाल २८८४ (सरासरी २६२५) असा बाजारभाव मिळाला. याठिकाणी ७०० ट्रॅक्टरमधून १५ हजार क्विंटल लाल कांदा आवक झाली. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात बुधवारी (ता.२७) ३३८ ट्रॅक्टरमधून सुमारे ६ हजार क्विंटल लाल कांदा आवक झाली. याठिकाणी लाल कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल २९७० (सरासरी २७५०) होते. कांदा आवकेत वाढ होवूनही बाजारभाव वधारले गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्यास मागणी राहिल्याने बाजारभाव वधारले गेल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल