आ‌वश्यकता भासल्यास आणखी कांदा खरेदी करणार : ना. डॉ. भारती पवार

डॉ. भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने घेणार आहे. या कांदा खरेदीला बुधवार (दि. 23) पासूनच सुरुवात होत आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार आहे. त्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंंत्री डॉ. भारती पवार यांंनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी 2हजार 410 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव निश्चित केला आहे. राज्यातील बाजार समित्या सोमवार (दि. 21) पासून बंद आहेत. व्यापारांना आमची विनंती आहे की, त्यांनी लिलाव सुरू करावे. बाजार समित्या सुरू झाल्या नाही, तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यापूर्वी नाफेड कधीही लाल कांदा खरेदी करत नव्हते. यावर्षी ते करत आहे. कांदा खरेदीबाबत अहमदनगर, नाशिक, लासलगाव केंद्रांतून कांद्याची खरेदी होणार आहे. राज्यातील कांदा प्रश्नी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंतीदेखील आम्ही केली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तत्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा आहे. यावेळी व्यासपीठावर नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, नाशिक महानगर माध्यम विभाग प्रभारी पवन भगूरकर, सुनील केदार, दिनकर पाटील, विक्रम नागरे उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील

केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जोपासण्यात आले आहे. लवकरच नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यातून राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्रातील तसेच राज्यातील सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.

– दादा भुसे, पालकमंत्री नाशिक.

हेही वाचा :

The post आ‌वश्यकता भासल्यास आणखी कांदा खरेदी करणार : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.