आशियाई पाणपक्षी गणना : नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ३२ हजारांवर ‘पाहुण्यांचा’ किलबिलाट 

नाशिक : गोदावरी व कादवा नदीच्या संगमावरील नांदूरमध्यमेश्‍वर धरणाचा फुगवटा मांजरगाव, चापडगावपर्यंत पसरला असून, पानवनस्पती, कीटक, शिंपल्यांमुळे येथे हिवाळ्यात अनेक पक्षी मुक्कामी असतात. पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अलींनी या स्थळाचा १९८२ मध्ये ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ असा उल्लेख केला आहे. बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे झालेल्या आशियाई पाणपक्षी गणनेत पाच दिवसांची ‘बर्ड रिंगिंग’ कार्यशाळा झाली. पक्षीगणनेत १२२ जातीच्या ३२ हजार ६७७ ‘पाहुण्यांचा’ किलबिलाट ऐकायला मिळाला. 

बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे मार्गदर्शन; पाच दिवस ‘बर्ड रिंगिंग’
पक्षी संमेलनाच्या माध्यमातून १९८५ मध्ये नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य राज्यात परिचित झाले. देशात एक हजार ३०१ जातीचे पक्षी आढळतात. त्यातील ६११ जातीचे पक्षी महाराष्ट्रात आढळत असून, त्यापैकी २६० जातीचे पक्षी अभयारण्यात पाहावयास मिळतात. कार्यशाळेत पक्षीगणना कशी करावी, केव्हा करावी, पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज कसा बांधावा, निरीक्षण करताना काय खबरदारी घ्यावी, समूहात घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची गणना कशी करावी आदींची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वन विभागाने अभयारण्यात वनकर्मचारी, गाइड आणि परिसरातील विद्यार्थ्यांना पक्ष्यांना ‘बर्ड रिंगिंग’ कसे करावे, पक्षीगणना कशी करावी, कोणते शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत, याची माहिती देण्यात आली. सोसायटीचे डॉ. राजू कसंबे, नंदकिशोर दुधे, तुहिना कट्टी, प्रियंका जुंधरे, विराज अथले, सागर महाजन, किरण तुम्मा यांनी संवाद साधला. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी भेट देऊन संवाद साधला. 

वन कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचाही उपक्रमात सहभाग
पक्षीगणनेत राखी बगळा, वंचक, चित्र बलाक, उघड्या चोचीचा करकोचा, शराटी, चमचा, पट्ट कादंब, चक्रवाक, कापशी बदक, थापट्या, गडवाल, जांभळी पानकोंबडी, जाकाना, पांढऱ्या छातीची पानकोंबडी, खंड्या, वेडा राघू, मैना, खाटीक, गप्पीदास, लाल मुनिया असे अनेक पक्षी पाहावयास मिळाले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हडपे, वनपाल अशोक काळे, गाइड अमोल दराडे, गंगा अघाव, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, विकास गारे, ओमकार चव्हाण, शंकर लोखंडे यांनी पक्षीगणनेत सहभाग घेतला. पक्षीमित्र डॉ. जयवंत फुलकर, डॉ. उत्तम डेर्ले, किशोर वडनेरे, अनंत सरोदे, नुरी मर्चंट, मेहुल थोरात, सतीश गोगटे, दत्ताकाका उगावकर आदींसह वन कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांचाही उपक्रमात सहभाग राहिला. 
 

काय आहे आशियाई पाणपक्षी गणना? 
स्थलांतर करणारे पक्षी, त्यांचे वितरण, स्थिती आणि त्यांचा सर्वसाधारण कल काय आहे, यासंबंधी माहिती संकलित करण्यासाठी ही गणना करण्यात येते. दर वर्षी हा उपक्रम देशभरात स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र आणि वन विभागाच्या माध्यमातून राबवला जातो. देशात या उपक्रमाची सुरवात १९८७ मध्ये वेटलंड इंटरनॅशनल आणि बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्यातर्फे झाली. 

पक्षीगणनेत आढळलेल्या पक्ष्यांची संख्या 
थापट्या- दोन हजार ९९५ 
वारकरी- सहा हजार ५२६ 
छोटा अर्ली- २२३ 
पाकोळी- पाच हजार ६७ 
करकोचा- ४३९ 
ससाणा- ३९ 
छोटा मराल- २१३ 

 

पाच दिवस आम्ही येथील गाइड, वन कर्मचारी आणि निवडक विद्यार्थ्यांना पक्षीगणना कशी करतात, बर्ड रिंगिंग कसे करतात, पक्ष्यांना कसे हाताळावे, पर्यावरण याविषयावर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, याची माहिती दिली. प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. त्याचा उपयोग पक्षीसंवर्धनासाठी होणार आहे. -राजू कसंबे, संचालक, संरक्षण शिक्षण केंद्र, बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई