आश्चर्यच! कुत्र्यांच्या अंगावरील केस झडतीमुळे म्हसरूळ भागात घबराट; पशुवैद्यकीयतज्ज्ञांकडून खुलासा

पंचवटी (जि.नाशिक) : म्हसरूळ भागातील पाळीव कुत्र्यांसह भटक्या कुत्र्यांच्या अंगावरील केस झडत असल्याने श्‍वानप्रेमींसह अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. पशुवैद्यकीयतज्ज्ञांनी यावर नागरिकांना सल्ला दिला आहे.

भटक्या कुत्र्यांच्या अंगावरील केस झडण्याच्या प्रकारांत मोठी वाढ
म्हसरूळ, मखमलाबादसह पंचवटीतील विविध उपनगरांत सद्या पाळीवसह भटक्या कुत्र्यांच्या अंगावरील केस झडण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत पशुवैद्यकीयतज्ज्ञांना विचारले असता, हा स्कीन डिसीजचा प्रकार आहे. ते व्हिटॅमिन ‘ए’ व ‘ई’च्या कमतरतेमुळे होऊ शकते किंवा वातावरणातील बदलामुळे होत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे केस झडल्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत पाळीव श्‍वान मृत्युमुखी पडल्याची तक्रार येथील काही शेतकऱ्यांनीही केली आहे. म्हसरूळ, मखमलाबाद, राशेगावसह परिसरातील बोरगड, प्रभातनगर आदी भागात असे कुत्रे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याबाबतचे मेजेसही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने याची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

लहान मुलांनी काळजी घेण्याचा सल्ला 

विशेष म्हणजे केस झडून काही पाळीव कुत्रे मृत झाल्याने बदललेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर हे होत असले तरी अशा कुत्र्यांपासून लहान मुलांनी काळजी घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीयतज्ज्ञ देत आहेत.

हा फंगल इन्फेक्शनच प्रकार असून, त्यामुळे श्‍वानांच्या अंगाला मोठ्या प्रमाणावर खाज सुटते. त्यामुळे जखमा होऊन जंतूंचा प्रादुर्भाव होतो. -डॉ. संजय महाजन, पशुवैद्यकीयतज्ज्ञ 

आमच्या दोन्ही पाळीव श्‍वानांच्या अंगावरील केस अचानक झडून दोन्हीही गतप्राण झाली आहेत. परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या अंगावरील केस झडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. -गोकुळ पिंगळे, शेतकरी, राशेगाव  
 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच