आषाढीसाठी गाव ते थेट पंढरपूर बससेवा

आषाढी एकादशी लालपरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आषाढी यात्रेसाठी नाशिकमधून पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिकमधील विविध आगारातून ३५० बसेस सोडण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या गावातून ४० पेक्षा जास्त भाविक एकत्रित मागणी करतील, त्यांना थेट गाव ते पंढरपूर अशी बस सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे भाविकांची प्रवासाची दगदग टळणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त विठुनामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक जात असतात. भाविकांना थेट पंढरपुरला जाण्यासाठी नाशिकमधील विविध आगारांमधून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी यात्राकाळात विविध आगारातून जवळपास ३५० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन आहे. या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

विविध मार्गांवर तपासणी नाके

तसेच यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांना प्रतिबंध करण्यासाठी एसटीच्या नाशिक विभागाने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर तपासणी नाके उभारण्याचे देखील नियोजन केले आहे.

पोलिसांना सहकार्य

दरम्यान, एकादशीच्या दिवशी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते ही कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून एसटीचे वाहतूक नियंत्रक व सुरक्षारक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

हेही वाचा –