आषाढी वारीतील सोयी-सुविधांसाठी दोन काेटींचा निधी

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – वारकऱ्यांचे लक्ष लागून असलेली आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, पंढरपूर यात्राेत्सवासाठी त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीसाठी संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यातच शासनाकडून निवृत्तिनाथ महाराज दिंडीसह संत सोपान देव व मुक्ताबाई यांच्या दिंडी सोहळ्यातील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात एकट्या निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सुमारे दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे रवाना होतात. यात महिला- पुरुषांसह बाल वारकरी यांचा सहभाग असतो. या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून निर्मलवारी उपक्रम राबविला जात आहे. यात भाविकांना मूलभूत सोयी-सुविधांचा समावेश आहे. यंदा संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याचे 20 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होणार असून, पंढरपूर येथे देवशयनी एकादशी आषाढ शु. 11 अर्थात 17 जुलैला दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

दिंडीत 50 हजार वारकरी होणार सहभागी

संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरदरम्यान वाटेवरील विविध गावांमधून हजारो वारकरी सहभागी होत असतात. पंढरपूरपर्यंत सुमारे 40 ते 50 हजार भाविक वारकरी यंदा दिंडीत सहभागी होतील, असा अंदाज आहे. या भाविकांना पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, स्नानगृहे, वीज, मुक्कामाच्या ठिकाणी पावसापासून बचावासाठी टेंट आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.

पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे. शासनाकडून दोन ते अडीच कोटी निधी सोयी-सुविधांसाठी मंजूर झालेला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सोयी-सुविधांचे नियोजन आहे. भाविकांना कुठल्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही याबाबत प्रशासनाने ग्वाही दिली आहे. – अमर ठोंबरे, सचिव, निवृत्तिनाथ महाराज.

अशा असतील सुविधा

सुविधा                                दिवस
फिरते शौचालय 250                26
पाण्याचे टँकर 06                     26
रुग्णवाहिका 02                       26
स्नानगृह 01                             07
निवारा केंद्र 01                        07
जनरेटर 2                               25
लाइट- मंडप २                        25

हेही वाचा: