Site icon

आस नवे शिकण्याची; ऊर्जा काम करण्याची…

नाशिक : ब्रेक टाईम

फाइल, मीटिंग, नियोजन, दौरे या सगळ्यात दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो ते समजतच नाही. मात्र, या सगळ्यात स्वतःला रिचार्ज करण्यासाठी मी एक ब्रेक टाइम घेत असते. तो ब्रेक टाइम म्हणजे त्या वेळेत काहीतरी नवीन शिकणे. मग त्यात कधी नवीन टेक्नॉलॉजी असो, नवीन खेळ असो किंवा एखादं संगीत वाद्य. यातून मला माझा ब्रेक टाइम नक्कीच मिळतो आणि नवी ऊर्जादेखील. हे बोल आहेत. नाशिकच्या जिल्हा परिषदेची धुरा लीलया पेलणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे.

आयआयटी मधून पदवी घेतल्यानंतर खासगी नोकरी केली. त्यात मन न लागल्याने त्यांनी सनदी सेवेचा मार्ग अवलंबला. सनदी सेवा परीक्षेचा अभ्यास करत असताना संदर्भ पुस्तकांचे वाचन, नोट्स काढणे, मनन करणे, सतत उजळणी करणे, सराव परीक्षा देणे, लिखाणाचा सराव करणे या सर्व गोष्टी नियोजनबद्ध करत असताना एक वेळ अशी यायची की, सर्व कंटाळवाणे वाटायचे. तेव्हा काहीतरी नवीन शिकणे हा प्रयोग सीईओ मित्तल यांनी करून बघितला आणि त्यानुसार थोडा वेळ काही नवीन शिकण्याकडे दिल्यानंतर पुन्हा ऊर्जा घेऊन त्यांचा अभ्यास सुरू व्हायचा. सनदी सेवेच्या परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा समजला जातो तो म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास चाचणी अर्थातच मुलाखत. सनदी सेवेच्या मुलाखतीसाठी अर्ज भरताना छंद म्हणून त्यांनी नवीन गोष्टी शिकणे असेच नमूद केले होते. मुलाखत घेणार्‍या मंडळाच्या सदस्यांनी यावर त्यांना जुजबी प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे मंडळाला पटली आणि गुण मिळण्यामध्ये त्यांना फायदादेखील झाला. अभ्यास करत असताना लागलेली सवय आता सेवेत आल्यानंतर रोजच्या आयुष्याचा एक भाग झाली आहे. त्यामुळेच कधीही न थकता काम करत राहणे हा पिंड त्यांनी स्वीकारलेला दिसून येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात दौरे, आढावा बैठका तसेच जिल्ह्यात काही नावीन्यपूर्ण तयार करता येईल का याकडे त्यांचा कटाक्ष आहे. ब्रेक टाइम नक्कीच त्यांना या सर्व कामात मदत करत असतो. नवीन काही शिकण्यामध्ये सीईओ मित्तल यांनी स्पॅनिश भाषा, योगा, व्यायामाचे प्रकार तसेच खेळामध्ये टेबलटेनिस, बास्केटबॉल वाद्यांमध्ये गिटार यांचे शिक्षण घेतले आहे. तसेच ऐतिहासिक डॉक्युमेंटरी, चित्रपट बघण्याकडे त्यांचा कौल असतो.

सर्वांना केले चकीत
जिल्हा परिषद कर्मचारी चषकमध्ये बुद्धिबळ आणि टेबल टेनिस यांसारख्या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेत त्यांनी सर्वांना चकित केले होते. तेव्हाच त्यांनी नवीन काहीतरी शिकत राहिल्याने हे सर्व जमत असल्याचे सांगितले होते.

(शब्दांकन : वैभव कातकाडे)

The post आस नवे शिकण्याची; ऊर्जा काम करण्याची... appeared first on पुढारी.

Exit mobile version