Site icon

आ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

देशाची अस्मिता, अखंडता, संविधान, लोकशाही धोक्यात आली असून जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यामुळे खा.राहुल गांधी यांनी देश आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची दुसरी लढाई आरंभ केली आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयाला स्पर्श करीत माणसं जोडणारी ही यात्रा आहे. त्यामुळे सर्वांनी खा.राहूल गांधी यांनी आरंभलेल्या भारत जोडो या चळवळीत सामील व्हावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.

समविचारी पक्ष आणि विविध क्षेत्रातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सोमवार, दि.7 नोव्हेंबरला प्रवेशित होणार असून नांदेड जिल्हयापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.  त्याअनुषंगाने धुळ्यातील बर्वे स्मृती छात्रालयात काँग्रेस व समविचारी पक्ष, विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते माजी मंत्री हेमंत देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी गुजरातधील मोरबी पुल दुर्घनेतील मृतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जातीयवादी शक्तीच्या विचारांवर घणाघात करीत धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काढलेल्या खा.राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे समर्थन केले. बैठकीत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रा.अविनाश पाटील यांनी बोलतांना सांगितले कि, देशाच्या हितासाठी खा.राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे.भारत जोडणार्‍या प्रत्येक व्यक्तीची ही यात्रा आहे. विचारांनी आणि कृतीने या लढ्यात सामील होण्याचे आवाहन भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक आ.शिरीष चौधरी यांनी केले आहे. मात्र, विरोधी पक्ष भारत जोडो यात्रेच्या चुका शोधण्याचे कपट कारस्थान रचत आहेत. परंतु गोरगरीब,सर्वसामान्य माणसाची शक्ती खा.राहूल गांधींच्या पाठीशी आहे.

बैठकीचे अध्यक्ष माजी मंत्री हेमंत देखमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, देशात भाजपाची सत्ता आली आणि भारत पारतंत्र्यात गेला. हुकूमशाही देशाच्या उंबरठ्यावर आली आहे म्हणून आज देशाला खा.राहूल गांधीची गरज आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी व स्वातंत्र्याच्या अस्तित्वासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे. शेतकरी, श्रमिक, गोरगरीब, युवकांचे राज्य आणायचे आहे. म्हणून मनभेद, मतभेद विसरुन सर्वांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केले. बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश दाणे, रणजित भोसले, एम.जी.धिवरे, डॉ.संजय पाटील, सत्तार शाह, अप्पा खताळ यांनी मनोगत व्यक्त केले. समविचारी पक्ष व विविध क्षेत्रातील संघटनेच्या बैठकीला अ‍ॅड.एम.एस.पाटील, अ‍ॅड. शामकांत पाटील, अ‍ॅड.बी.डी.पाटील, कॉ.पोपटराव चौधरी, एम.जी.धिवरे, माजी खा.बापू चौरे, माजी आ.डी.एस.अहिरे, साबीर खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे, किरण पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, युवराज करनकाळ, हेमंत मदाणे, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post आ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा appeared first on पुढारी.

Exit mobile version