राज्यातील विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडून गेलेल्या आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह पाच सदस्यांचा कार्यकाळ शुक्रवारी (दि. २१) संपुष्टात येणार आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे सर्वत्र प्रशासकराज आहे. लोकनियुक्त प्रतिनिधीच नसल्याने विधान परिषदेच्या नव्याने निवडणुका होणे शक्य नाही. त्यामुळे विधान परिषदेमधील सदस्यसंख्या घटणार आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या चार जागांपैकी नाशिक आणि मुंबई दोन जागा शिक्षक मतदारसंघ, तर मुंबई आणि कोकण या दोन जागा पदवीधर मतदारसंघाच्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळत आहे.
विधान परिषदेमध्ये विधानसभा सदस्यांमधून ३० सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून २२ सदस्य, शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमातून सात सदस्य, पदवीधर मतदारसंघातून सात सदस्य तसेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्य असे एकूण ७८ सदस्य आहेत. सध्याची परिस्थिती बघता, विधानसभा सदस्यांमधून येणाऱ्या ३० पैकी ३० सदस्य विधान परिषदेमध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या २२ पैकी १० सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे, तर पाच सदस्यांचा येत्या २१ जूनला संपणार आहे.
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी सात सदस्यांपैकी दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, तर पाच सदस्य आहेत. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने या जागादेखील रिक्त आहेत.
कार्यकाळ संपत असलेले आमदार
- नरेंद्र दराडे (नाशिक)
- सुरेश धस (धाराशिव, लातूर, बीड)
- प्रवीण पोटे (अमरावती)
- रामदास आंबटकर (वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली)
- विप्लव बजोरिया (परभणी, हिंगोली)
विधान परिषदेतील राजकीय सद्यस्थिती
सध्या विधान परिषदेमधील ७८ पैकी राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त आहेत. तर उर्वरित ६६ पैकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १० जागा रिक्त असल्याने ५६ एवढ्या जागा आहेत. यापैकी चार जागांसाठी राज्यात निवडणूक कार्यक्रम सुरू असल्याने उर्वरित ५४ जागांपैकी महायुतीचे ३५ सदस्य, तर महाविकास आघाडीचे १८ सदस्य विधान परिषदेमध्ये आहेत.
महायुती
भाजप – २१, राष्ट्रवादी अजित पवार गट – ६, शिवसेना शिंदे गट – ४, रासप – १, अपक्ष – ३
महाविकास आघाडी
शिवसेना उबाठा – ६, काँग्रेस – ८, राष्ट्रवादी शरद पवार गट – ३, शेकाप – १
हेही वाचा: