इंग्रजी शाळांचे अर्थचक्र ग्रामीण भागात थांबले; संस्थाचालकांसह शिक्षक, कर्मचारी बेरोजगार 

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : कोरोना काळात अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले. उद्योग, व्यवसाय, अनेकांचे रोजगार गेले. गंभीर परिस्थितीमुळे वर्षभर शाळा उघडल्या नाहीत. गावोगावच्या इंग्रजी शाळांमध्ये वर्षभर विद्यार्थीच न गेल्याने पालकही शुल्क देत नसल्याने शाळांची घंटा वाजलीच नाही. परिणामी, संस्थाचालकांसह शिक्षक, चालक, मदतनीस, वॉचमन अशा अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. 

इंग्रजी शाळांचे अर्थचक्र ग्रामीण भागात थांबले 
छोट्या-मोठ्या भांडवलावर गाव खेड्यात सुरू केलेल्या या शाळांतील खर्च भागला गेला नाही. स्वंय अर्थसहाय्यित इंग्लिश स्कूल असल्याने परिसरातील अनेक डी. एड. व बी. एड. असलेल्यांना तात्पुरती नोकरी होती. कोरोनामुळे या सर्व खासगी शिक्षकांनी भाजीपाला विकून, शेतीकाम करून कुटुंबास हातभार लावला. यात प्रामुख्याने महिलांचे प्रमाण अधिक होते. शिक्षिकांच्या वेतनावर कुटुंब असल्याने अनेकांना उधार उसनवारी करावी लागली. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी पालकांची दर वर्षीप्रमाणे शुल्क न मिळाल्याने आर्थिक बोजवारा उडाला.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

कोरोनामुळे संस्थाचालकांसह शिक्षक, कर्मचारी बेरोजगार 

परिसरातील गावांसह शेतमळ्यातून मुले ने- आण करण्यास अनेक शाळांचे स्वमालकीचे, अनेकांनी बॅंकेच्या कर्जाने वाहने घेतली. वाहनांवर बॅंकेचे कर्ज हप्ते फेडण्यासाठी नाकीनऊ येत असल्याचे अनेक संस्थाचालकांनी बोलून दाखवले. इमारतींचे भाडे विद्यार्थ्यांविना अदा करावे लागले. शाळा सुरू होणार, या आशेवर वर्षभरात चार वेळा स्वच्छता करण्यावर खर्च झाला. मात्र अखेरपर्यंत स्कूल सुरू न झाल्याने वर्षभराचे अर्थकारण बिघडले आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

पदव्युत्तर बेरोजगार वॉचमन 
बेरोजगारीने कळस गाठला असून, इंग्लिश स्कूलमध्ये काम करणाऱ्या अनेकांना कुटुंबासाठी रोजगार शोधावा लागला. घरात खाणारी तोंडं चार, कमावणारा एक, अशा स्थितीत पदव्युत्तर असलेल्या व्यक्तिला हॉटेलवर वॉचमन, वेटर म्हणून काम करावे लागत असल्याचे अनुभव बोलून दाखवले. 

 

ग्रामीण भागातील पालकांनी फी न दिल्याने मेटाकुटीला आलो. आमच्याकडे असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यना वाऱ्यावर न सोडता मदतीचा हात दिला. वास्तविक, एकीकडे मुले शाळेत दाखल असताना शासनाच्या फी न देण्याची गळचेपी स्वंय अर्थसहाय्यित शाळांच्या मुळावर आली. -किरण शेवाळे, संचालक, शिव संस्कार इंग्लिश स्कूल, टेहेरे 

अनेक वर्षांपासून शिक्षक भरती नाही. त्यातही बेरोजगारीवर मात म्हणून गाव परिसरात इंग्लिश स्कूलचा आधार घेतला. कोरोनाच्या संकटाने पालकांच्या फी देण्याच्या नकारात्मकतेने तोही रोजगार गेला. संस्थेने शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न केला. शासनाने बेरोजगारांनाही मदत करावी. 
-तरन्नुम कादरी, शिक्षिका