इंटरनेटच्या ‘स्पीड ब्रेक’मुळे अभ्यासात व्यत्यय; विद्यार्थ्यांचा प्रचंड संताप

मनमाड (नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘वर्क फॉर होम’ करणारे कर्मचारी आणि ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरात सध्या मोठ्या अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येसुद्धा सगळ्याच कंपन्यांचे इंटरनेट बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने सगळेच त्रस्त आहेत. त्यातच मोठमोठ्या किमतीचे इंटरनेट पॅक व त्या अनुषंगाने विविध आमिषे दाखवून ग्राहकांना भुलवून कंपन्या आपले उखळ पांढरे करत आहेत. इंटरनेटच्या स्पीडपासून तर अन्य सेवांपर्यंत ग्राहकांच्या सुविधांबाबत या कंपन्यांना काहीही घेणे-देणे नसल्याचेच सध्या दिसून येत आहे.

विविध कंपन्यांनी बाजारात आकर्षक इंटरनेट पॅक

कोरोनाने जगाला जागीच थोपवून धरले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या. कर्मचाऱ्यांनी कंपनीत न जाता घरीच राहून कामाला सुरवात केली आहे. ‘वर्क फॉर होम’ करून कोरोनाला थोपवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना आपल्या कामासाठी इंटरनेटची आवश्‍यकता भासते. तसेच, दुसरीकडे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अँड्रॉइड मोबाईलवर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. खासगी क्लासचालकांनीही ऑनलाइन क्लास सुरू केले. त्यामुळे इंटरनेटवर विसंबून राहणाऱ्या ग्राहकांमध्ये विद्यार्थ्यांचीही भर पडली. नेमकी हीच बाब हेरून विविध कंपन्यांनी बाजारात आकर्षक इंटरनेट पॅक आणले.

अभ्यासात व्यत्यय येऊ लागल्याने सर्वत्र संताप

कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गरज म्हणून विविध मोबाईल कंपन्यांचे इंटरनेट पॅक खरेदी केले. त्याचवेळी मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरची विक्री जोरात झाली. या सर्व गदारोळात सुरवातीला सर्वच ठिकाणी, सर्वच कंपन्यांच्या इंटरनेटला चांगला स्पीड मिळाला. मात्र, त्यानंतर हळूहळू स्पीड कमी-जास्त होत गेला. सध्या इंटरनेटचा स्पीडच नव्हे, तर बहुतांश भागात रेंज, आवाजाची स्पष्टता यांसारख्या अडचणींनाही तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. इंटरनेटला स्पीडच नसल्याने कर्मचाऱ्यांना कामात अडथळे येताहेत. तर विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येऊ लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

कंपन्यांचे लक्ष बिलवसुलीवरच

लॉकडाउनच्या काळात सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांनुसार कधी नव्हे, त्या बँकांनीसुद्धा कर्जवसुली थांबवली होती. कारखाने, खासगी अस्थापना आदींमध्येही वेतनकपात, कर्मचारीकपात यासारखे प्रयोग राबविले गेले. वीजबिलाचा प्रश्‍नही अद्याप रेंगाळलेला आहे, असे असताना मोबाईल कंपन्यांनी मात्र कोणत्याही माध्यमातून कुठलीही सुविधा आपल्या ग्राहकांना दिलेली नाही. संकट काळातही सक्तीच्या बिलवसुलीसाठी ऑनलाइन सुविधा, नवनवीन इंटरनेट पॅकच्या नावाखाली दरवाढ, ग्राहकांच्या तक्रारींना कचऱ्याची टोपली यासारखी मनमानी सुरूच ठेवली आहे. एवढेच नव्हे, तर आता सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. घरी अँड्रॉइड मोबाईल नव्हता. केवळ अभ्यासासाठी मोबाईल विकत घेतला. इंटरनेट पॅक घेऊन ऑनलाइन अभ्यास सुरू केला. मात्र, काही दिवसांपासून इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने व्यत्यय येत आहे. - साक्षी धिवर, विद्यार्थिनी, वंजारवाडी

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली