वाहनचालकांना शिस्तीसाठी मनपाच्या बांधकाम विभागाने शहरातील आवश्यकता असलेले रस्ते सोडून भलत्याच ठिकाणी मोठ्या उंचीचे गतिरोधक उभारण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच रविशंकर मार्ग ते विजय-ममता सिग्नल ते वडाळा गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्याच्या पुलावर फारशी वाहतूक नसतानाही तेथे चक्क सिग्नल व्यवस्था सुरू केल्याने नागरिकांनी महापालिकेच्या या अजबगजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
- महापालिकेच्या अजबगजब कारभाराबद्दल नागरिकांकडून होतेय आश्चर्य व्यक्त.
- काही रस्त्यावर सिग्नल यंत्रणेची गरज असतानाही तेथे मात्र सिग्नल यंत्रणाच बसविण्यात आलेली नाही
- तर काही ठिकाणची सिग्नल यंत्रणा शोभेसाठी असून कधीही सुरू नसते.
आवश्यक स्पॉटकडे होतोय कानाडोळा
रविशंकर मार्ग ते वडाळा गाव या रस्त्यावर नाल्यांवर असणारे चार पूल चौकात येऊन मिळतात, त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नाही. परंतु वाहतूक सुरळीत सुरू आहे. वडाळा गाव तसेच संत सावता माळी रोड आंबेडकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिग्नल यंत्रणेची गरज असतानाही तेथे बसविण्यात आलेली नाही. गुरुगोविंद सिंग कॉलेजसमोर कधीही चालू नसणारी सिग्नल यंत्रणा शोभेसाठी लावून ठेवलेली आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या ठिकाणी अपघातांत पाच ते सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मुख्य रस्त्यावर वळणाऱ्या उपनगरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये रस्त्यावर गतिरोधक टाकून अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. -नारायण जाधव, स्थानिक रहिवासी
वडाळा-पाथर्डी मार्गावर जगन्नाथ चौक हा नव्याने विकसित होणाऱ्या भागांपैकी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या ठिकाणी गतिरोधक आवश्यक असताना ते बसविण्यात आलेले नाहीत. तसेच सराफ लॉन्स येथून सराफनगरकडे वळणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने रस्त्यात येणारा कडुनिंबाचा मोठा वृक्ष तोडून रस्ता वाहतुकीला मोकळा केला. परंतु या ठिकाणी गतिरोधक न टाकल्यामुळे सराफनगरकडे जाणाऱ्या नागरिकांचे रोजच छोटे-मोठे अपघातांचे प्रकार घडत आहेत.
रविशंकर मार्ग येथील वडाळा गाव ते विजय-ममता सिग्नल या ठिकाणी फारशी वाहतूक नसताना पावसाळी नाल्याच्या पुलावर महापालिकेने वाहतुकीचा सिग्नल का उभारला, याचे कोडे नागरिकांना पडले आहे. परंतु वडाळागाव- इंदिरानगर बोगद्यातून आंबेडकरनगरला जाणाऱ्या व रविशंकर मार्गाला वळणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आवश्यक होती. परंतु तेथे बसविण्यात आलेली नाही. -जयेश आमले, स्थानिक रहिवासी
महापालिकेच्या अजब कारभाराचा प्रकार पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावदरम्यान पाहावयास मिळतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीमुळे गत काही महिन्यांत पाच ते सहा नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी महापालिकेने कोणतेही गतिरोधक बसवले नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात दररोज होत आहेत.
सराफ लॉन्ससमोरील वळण रस्त्यावर गतिरोधक गरजेचा असताना त्या ठिकाणी गतिरोधक न टाकता दुसऱ्या ठिकाणी टाकल्यामुळे पाथर्डी गावाकडून इंदिरानगरकडे येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे येथे वरचेवर छोटे-मोठे अपघात होतात. -गोरख सराफ, रहिवासी, सराफनगर
हेही वाचा: