इंदिरानगरला अवैध जुगार अड्ड्यावर छापा, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

crime

सिडको(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा ; येथील पेरूचा बाग परिसरात बांदेकर यांच्या शेतातील एका शेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी बुधवारी रात्री या अड्ड्यावर छापा टाकत १४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे १४ जणांसह १८ दुचाकी व चारचाकी असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला आहे. मु‌ख्य म्हणजे इंदिरानगर पोलिसांना याबाबत काहीच माहिती नसल्याची चर्चा होती. (INashik Crime)

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडाळा गाव, राजीवनगर, सादिकनगर यांसह विविध भागांत अवैध गांजा विक्रीसह अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. येथील पेरूचा बाग परिसरातील प्रकाश बांदेकर यांच्या शेतात, बांदेकर व समीर पठाण हे राजरोसपणे अवैध जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांना मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे यांना पथके तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शेडमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल ८५,२८५ रुपयांची रोकड मिळून आली. यावेळी त्यांचे मोबाइल तसेच दुचाकी व चारचाकी एकूण 18 वाहने जप्त करण्यात आली. या कारवाई पोलिसांनी 13 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दिलीप तुकाराम कराड (५७), मोहन खंडेराव मोरे (५१), दीपक खंडू पारधी (३८), सलीम भिकन शेख (४५), सुनील तुकाराम संगगोरे (५६), हेमंत लहू काळे (४०), हसन पीर मोहम्मद शेख (५५), हनिफ इस्माईल शेख (५०), नासिर गफूर सय्यद वय (५०), रमेश नारायण वाणी (३४), योगेश कचरू चोथरे (४०), सुमित सुधीर साळवे (२९), दादू लक्ष्मण खोडे (४२) यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

The post इंदिरानगरला अवैध जुगार अड्ड्यावर छापा, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.