इगतपुरी (जि.नाशिक) : तालुक्यातील भावली येथील निवासी एकलव्य आश्रमशाळेत कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या १९ विद्यार्थिनी व सहा विद्यार्थी असे २५ विद्यार्थी बुधवारी (ता. २४) तपासणीत कोरोनाबाधित आढळले. याशिवाय तालुक्यात गुरुवारी (ता. २५) एकूण ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात ६२५ पेक्षा जास्त रुग्ण नमुने तपासणी करण्यात आली आहे.
संसर्गाला गंभीरपणे घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे
काही विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असून, गंभीर लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार सुरू केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी माहिती दिली. शिक्षक बाधित असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाने एकलव्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. आतापर्यंत तालुक्यात २६० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील नागरिकांनी आता कोरोना संसर्गाला गंभीरपणे घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे, असे डॉ. देशमुख म्हणाले. एकलव्य आश्रमशाळेत मागील वर्षी कोविड सेंटर तयार केले होते. तेव्हा तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचे प्रमाण फारच कमी होते.
सर्वच नागरिकांनी नियमांचे पालन करून गर्दी टाळावी, मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करून साबणाने हात धुवावेत आदी नियमांचे काटेकोर पालन करावे.
-परमेश्वर कासुळे, तहसीलदार