इगतपुरीत नियम न पाळणाऱ्या हॉटेलवर कारवाई; विनामास्क आढळल्याने दंड 

इगतपुरी ( जि. नाशिक) : इगतपुरीजवळील बलायदुरीतील हॉटेल रेन फॉरेस्ट येथे गुरुवारी (ता. २५) रात्री नऊच्या दरम्यान सुरू आलेल्या विवाह सोहळ्यात नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनात येताच पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले घटनास्थळी पोचताच विवाहात विनामास्क ३० जण आढळून आले. हॉटेल व्यवस्थापक व मालकांकडून दंडात्मक कारवाई स्वरूपात ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

तालुक्यात कोविड रुग्ण वाढण्याची शक्यता

या कारवाईत इगतपुरी, घोटी पोलिस ठाणे, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यापूर्वीही २६ जूनला महाराष्ट्रात सर्व हॉटेल बंद असताना हे हॉटेल सुरू होते. तेव्हाही इगतपुरी पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई केली होती. इगतपुरी तालुक्यातील अनेक हॉटेलमध्ये सर्रास पर्यटक डीजेच्या तालावर नाचत पार्ट्या करतात. या पार्टीत कोणतेही नियम पाळले जात नाहीत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी होत नाही. त्यामुळे तालुक्यात कोविड रुग्ण वाढण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविली जात आहे. हॉटेल व्यावसायिक सर्व नियम धाब्यावर ठेवत असल्याने त्यांना पाठबळ कोणाचे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पाटील व पथक तपास करीत आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना