घोटी (नाशिक) : आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बागायती पिकांकडून कडधान्य पिकांकडे वाढता कल पाहता, बेभरवशाच्या बागायती पिकांमुळे कडधान्य क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचे नेहमीच होणारे नुकसान आणि त्यातून जगण्यासाठी मार्ग काढताना राबराब राबूनही हाती काही पडत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. बागायती हंगाम सुरू होऊन पंधरवडा उलटला आहे.
कडधान्याकडे ओढा वाढला
सहा वर्षांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने होत्याचे नव्हते झाले. तर दुसरीकडे बागायती पिके हाती येताच व्यापाऱ्यांकडून संगनमत करून दर पाडले जातात. बागायती पिकांना तालुक्यात कोणत्याही प्रकारचे कोल्ड स्टोरेज नसल्याने पिके शेतात दर असो वा नसो ठेवता येत नाहीत. त्यात लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष शेतकऱ्यांना जखमा देणारा अनुभव कित्येक वर्षांपासून गाठीशी आहे. भंपक केलेली आंदोलने, शेतकरी नेते अशी शेखी म्हणून मिरवणारे स्वयंघोषित नेते यामुळे हैराण शेतकऱ्यांचा कल कडधान्य पिकांकडे वाढल्याचे आशादायक चित्र आहे. कडधान्य पिकांना कोल्ड स्टोरेजची गरज नसते, त्यातून दर मिळेल तेव्हा विकण्याची संधी निर्माण होत असल्याने साहजिकच कडधान्याकडे ओढा वाढला आहे.
हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची
शेतकऱ्यांचा चांगला फायदा
कृषी विभागाच्या माहितीनुसार चालू हंगाम आशादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. कडधान्य पिकांना पाणी कमी लागतेच शिवाय रासायनिक खतांचा मारा कमी होत असल्याने मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही. यातून शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या योजना गावोगावच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी डॉ. शीतलकुमार तंवर यांनी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचा कडधान्ये पिकांकडे कल वाढला आहे.
हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच