
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (दि.२५)पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org. या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने केले जातात. २०२३-२४ या वर्षातील प्रवेशसुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच केले जाणार आहेत. शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो. त्यानुसार येत्या 25 मेपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे.
उच्च माध्यमिक विद्यालयांना इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे. इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येईल, असे राज्य मंडळातर्फे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, बिनचूक प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २० ते २४ मे या कालावधीत सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- कबाब खरेदी करण्यासाठी गेला आणि कोट्यधीश झाला!
- पुणे : मी खुनाचा प्रयत्न, गोळीबार करणारा मोठा गुन्हेगार, असे म्हणत तरुणाला मारहाण
- पुणे : मी खुनाचा प्रयत्न, गोळीबार करणारा मोठा गुन्हेगार, असे म्हणत तरुणाला मारहाण
The post इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया appeared first on पुढारी.