इ टॅगिंग 34 लाखांचे बेवारस गाेवंशाची दाभाडी गोशाळेत रवानगी

मालेगाव : नीलेश शिंपी

मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या दोन दिवसात 34 लाख 31 हजार रुपये किंमतीचे 97 गोवंश जनावरे बेवारसस्थितीत आढळून आली आहेत. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील 76 जनावरांना इ टॅगिंग करण्यात आली असून 21 जनावरांना इ टॅगिंग करण्यात आलेली नाही. दरम्यान, ही सर्व 97 जनावरे दाभाडी येथील गोशाळेत पाठविण्यात आलेली आहेत.

  • मालेगाव कृऊबा आवारात बांधून ठेवलेली बेवारस 97 गोवंश जनावरे आढळली असून 34 लाख 31 हजार रुपये किंमतीच्या या जनावारांची दाभाडी गोशाळेत रवानगी करण्यात आलेली आहे.
  • सर्व जनावरे राज्यात गोवंश हत्याबंदी लागू असतानांही चारापाण्या अभावी उपाशीपोटी बांधलेली आढळली होती.
  • बकरी ईद झाल्यानंतर सलग दोन दिवस चारापाण्या अभावी उपाशीपोटी बांधलेली आढळली.

येथील बाजार समितीत महिन्याच्या दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री होत असते. याच बाजार समितीच्या आवारात सोमवारी (दि.17) 29 लाख 11 हजार रुपये किंमतीचे 88 जनावरे बेवारसस्थितीत बांधलेली आढळून आली होती. ही सर्व जनावरे चारापाण्या अभावी उपाशी पोटी होती. यासंदर्भात बाजार समितीने कॅम्प पोलीस ठाण्याला पत्र देऊन कळविण्यात आल्यानंतर कॅम्प विभागाचे सहायक पोलीस उपअधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्यासह पोलीस निरिक्षक गडकरी, सहायक पोलीस निरिक्षक दिवटे, नारखेडे, पोलीस हवालदार डिंगर, पोलीस नाईक गोसावी, भामरे, वाघ आदींनी बाजार समिती आवारात धाव घेतली.

पोलीस पथकास गोवंश जनावरे उपाशी पोटी बांधून ठेवलेली आढळून आली. यासंर्भात बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. विनोद चव्हाण यांच्याकडे पोलीसांनी मालकी हक्काबाबत विचारपूस केली असता कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस हवालदार रुपचंद पारधी यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात गोवंश जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता उपाशी पोटी बांधून ठेवणार्‍या अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दुसर्‍या दिवशीही मंगळवारी (दि.18) 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 9 गोवंश जनावरे बाजार समितीच्या आवारात बेवारसस्थितीत आढळून आली. ही जनावरे देखील चारा पाण्याअभावी उपाशी पोटी बांधून ठेवण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नऊ गोवंश जनावरांना इ टॅगिंग करण्यात आलेले आहे. असे एकूण 34 लाख 31 हजार रुपये किंमतीच्या या जनावारांची दाभाडी गोशाळेत रवानगी करण्यात आलेली आहे.

पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचा अभिप्राय

पोलीसांनी जनावरांची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. खाटीक यांना बोलावून घेत लेखी पत्र देऊन वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक गोवंश जनावरांना चारापाणी देण्यात आलेला नसल्याचा अभिप्राय वैद्यकिय अधिकारी यांनी दिला. हे सर्व गोवंश जनावरे दाभाडी व मुंगसे येथील गोशाळेत पोलीसांनी पाठवली आहेत.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने बकरी ईद काळात जनावरे खरेदी-विक्रीच्या पावत्या दिल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी खरेदी विक्री झालेली गोवंश जनावरे बाहेर निघाली नाहीत. त्याच प्रमाणे याठिकाणी पोलीस व गोरक्षक असल्याने कोणीही विकत घेतलेली जनावरे नेली नाहीत. बकरी ईद झाल्यानंतर या जनावरांसदर्भात चौकशी करण्यात आली. त्यात बाजार समितीत जे जनावरे खरेदी विक्री करतात अशा कायमस्वरुपी व्यापार्‍यांशी चर्चा करीत त्यांच्याकडील गोवंश जनावरे खरेदी विक्रीसंदर्भातील शेतकर्‍यांचा सातबारा उतारा, पोलीस पाटील व स्थानिक ग्रामपंचायतीचा शेतकरी असल्याचा पुरावा बघत त्यांनी खरेदी केलेली गोवंश जनावरे बाजूला करण्यात आली. त्यामुळे या दोन दिवसात तब्बल 97 गोवंश जनावरे बेवारसस्थितीत आढळून आली. पोलीसांनी ही सर्व गोवंश जनावरे विविध गोशाळेत पाठवली आहेत. ही जनावरे कोणी खरेदी केली? हे मात्र अद्याप कळू शकले नाही.- अ‍ॅड. विनोद चव्हाण, उपसभापती कृऊबा मालेगाव.

हेही वाचा: