ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका

खडसे-महाजन,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

माझ्यामागे इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या हितासाठी वेळ द्या. राज्यात सुडाचे राजकारण सुरू असून, विरोधात बोलले, तर ईडी लावायची, सीबाआय लावायची अशा स्वरुपाचे उद्योग करून दडपशाही केली जात आहे. माझ्यामागे तर गिरीशने सगळ्या यंत्रणा लावल्या अन् मला विचारतो, मला मोक्का का लावला? तू ईडी लावली म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला. ईडी नसती, तर मोक्का कशाला लागला असता? असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.

जामनेर येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणस्थळी आ. खडसे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष महबूब शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. कांदा, कापूस आणि इतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हे उपोषण करण्यात आले. यावेळी बोलताना आ. खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.

… नाही, तर महाजन पेन्शनवर जगले असते

आता तर न्यायालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस दिली. गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केले, हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहीत आहे. गिरीश महाजन चांगला मुलगा आहे म्हणून त्यांना आम्ही वर आणण्याचा प्रयत्न केला. नाही तर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवरच जगले असते. मी गेलो म्हणून गिरीश महाजन फरदापूरला वाचले. त्यावेळी कोणत्या अवस्थेत गिरीश महाजन होते, ते मी पाहिले होते. पोलिस निरीक्षकाने महाजन यांच्या कानाखाली वाजवली होती. विविध मथळ्यांखाली तेव्हा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मी होतो म्हणून ते वाचले. माझीच मोठी चूक झाली. त्यावेळी गिरीश महाजन यांना मध्ये टाकले असते, तर बर झाले असते, अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून फॉरेन दौऱ्यावर…

जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाच्या हमीभावासाठी बोलले पाहिजे. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही, एके काळी गिरीश महाजन यांनी सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते. मग, आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते फॉरेन दौऱ्यावर फिरत आहेत, अशी टीकाही खडसे यांनी केली.

हेही वाचा :

The post ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका appeared first on पुढारी.