ईद-ए-मिलाद : मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर

ईद-ए-मिलाद www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
‘ईद – ए – मिलाद’ निमित्त रविवारी (दि. 9) सर्वत्र साजर्‍या होणार्‍या उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 4)पोलिस नियंत्रण कक्षात आढावा बैठक पार पडली. शहरातून निघणार्‍या मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी 30 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन आहे. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसले, तरी कायद्याच्या चौकटीत राहूनच मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

प्रेषित पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. यानिमित्त शहराच्या विविध भागांत मिरवणुका निघतात. पिवळा पंपापासून प्रमुख मिरवणूक निघते, ती प्रमुख मार्गावरून एटीटी हायस्कूलच्या मैदानावर दाखल होत असते. त्यात हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी होत असतात. या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, पोलिस कर्मचारीदेखील व्हिडिओ कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करणार आहेत. पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाचे मौलाना अहमद रजा अझहरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक सण-उत्सव काळात वीज, रस्ते, गटार, अतिक्रमण आदी मुद्दे ऐरणीवर येतात. त्यावर संबंधित विभागांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली. बैठकीस पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, सुन्नी जमियतचे प्रमुख युसूफ इलियास, सुफी अनिस कादरी, अ‍ॅड. हिदायतुल्ला, सलाम कुरैशी, रमजान अब्बास, रियाज अत्तरवाले, अतहर हुसैन अशरफी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post ईद-ए-मिलाद : मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर appeared first on पुढारी.