उजनीत दहशत कायम! बिबट्या तर जेरबंद; पण मादीसह दोन बछड्यांचे काय? 

सिन्नर (जि.नाशिक) : तालुक्यातील उजनी शिवारात गेल्या दोन आठवड्यापासून दहशत निर्माण करणारा बिबट्या आज (ता.27) पहाटे पाच वाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पिंजऱ्यात अडल्यानंतर तेथे एका मादीसह 2 बचड्यांनी दर्शन दिल्यामुळे बिबट्याची दहशत कायम राहिली आहे.

मादीसह 2 बछड्यांची दहशत कायम

गेल्या आठवड्यात वत्सलाबाई सोपान जाधव यांच्या गोठ्याचे जाळीचे कुंपण तोडून बिबट्याने पाच शेळ्या ठार मारल्या होत्या. अगोदर एक शेळी ओढून नेली होती. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना बचड्यांसह मादीचे दर्शन घडले होते.  जाधव यांच्या शेळ्या ठार मारल्यानंतर वनविभागाने तातडीने पिंजरा लावत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान बिबट्या अडकला. पिंजऱ्यात जेरबंद झालेल्या या बिबट्याने डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिंजरा लावलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तेथे त्यांना पिंजऱ्याबाहेर आणखी एक मादी व दोन बछडे आढळून आले.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

शेतकऱ्यांमध्ये भीती कायम

एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद असला तरी मादी व बचड्यांचे वास्तव्य कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे. दरम्यान सकाळी वनविभागाला कळवल्यानंतर जेरबंद झालेल्या बिबट्याची रवानगी मोहदरी येथील वन उद्यानात करण्यात आली.  परिसरात पिंजरा कायम ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच