Site icon

उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा

नाशिक : सतीश डोंगरे
भारत सरकारच्या आरसीएस – उडान (प्रादेशिक संपर्क योजना – उडे देश का आम नागरिक) या योजनेंतर्गत नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली. देशातील प्रमुख 9 शहरांना थेट जोडणार्‍या या विमानसेवेचा केवळ नाशिकच्या व्यापार – उद्योगालाच लाभ झाला नाही, तर विमान कंपन्याही मालामाल झाल्या. केंद्राकडून दिल्या जाणार्‍या सबसिडीमधूनच नव्हे, तर प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामधूनही कंपन्यांना चांगला महसूल प्राप्त झाला. मात्र, अशातही कंपन्यांनी अचानक सेवा बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा चकीत करणारा असून, नाशिकच्या विकासाला खंडित करणारा ठरत आहे.

नाशिकमधून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूसह नऊ वेगवेगळ्या प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती. सुरुवातीला पाच विमान कंपन्यांकडून सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या कंपन्यांनी कोणत्या शहरात नाशिकहून विमानसेवा दिली जाईल, हेदेखील स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र तीनच कंपन्यांनी आपल्या विमानसेवा सुरू केल्या, तर दोन कंपन्यांनी अजूनपर्यंत आपल्या सेवा सुरूच केल्या नाहीत. दरम्यान, तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी अचानक आपल्या सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद केल्याने सद्यस्थितीत केवळ एकाच कंपनीकडून नाशिकहून विमानसेवा सुरू आहे. खरे तर 2020 पासून सुरू झालेल्या या विमानसेवेला केंद्राकडून 50 टक्के प्रतिसीट याप्रमाणे सबसिडी दिली जात होती. त्याहीपेक्षा प्रवासी संख्याच पुरेशी असल्याने, सबसिडीबरोबरच प्रवासी तिकिटांमधून कंपन्यांना मोठा महसूल प्राप्त झाला. सर्वच कंपन्यांच्या फ्लाइटमध्ये सरासरी 80 टक्के प्रवासी संख्या असल्याचे आकडेवारीवरून समोर येते. जेव्हा नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यात आली, तेव्हा केंद्राने नऊ शहरांना सबसिडी देण्याचे स्पष्ट केले होते. त्यामध्ये दिल्ली, भोपाळ, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद (2), बेळगाव, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या मार्गावर ज्या-ज्या कंपन्यांनी सेवा दिली, त्या सर्व कंपन्यांना प्रवासी तिकिटांमध्ये 50 टक्के सबसिडी प्राप्त झाली. यातून कंपन्यांना कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला.

80% सरासरी प्रवासी संख्या : नाशिकमधून ज्या नऊ शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती, त्या शहरात जाणार्‍या फ्लाइटमध्ये नेहमीच सरासरी 80 टक्के प्रवासी संख्या असायची. नाशिकमध्ये 180, 72, 90 व 50 सीटर फ्लाइट सुरू होती. प्रवासी संख्येच्या 50 टक्क्यांपर्यंत कंपन्यांना सबसिडीदेखील मिळायची.

नाशिकमधून ज्या कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली, त्या सर्व कंपन्यांचा फायदाच झाला आहे. सबसिडी हा एक भाग असला तरी, नाशिकमधून प्रवाशांनीदेखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. शिवाय सुविधाही उत्तम आहेत. – मनीष रावल, अध्यक्ष, आयमा एव्हिएशन कमिटी

दिल्ली-हैदराबाद सेवा सुरू : एअर अलायन्स आणि स्टार एअरने 1 नोव्हेंबर 2022 पासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सद्यस्थितीत केवळ स्पाइस जेटकडून दिल्ली-हैदराबाद ही विमानसेवा सुरू आहे. नाशिककरांना हा काहीसा दिलासा असला तरी, इतरही सेवा पूर्ववत व्हाव्यात याकरिता पुरेसे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

इंडिगोचा नकारच : नाशिकहून विमानसेवा सुरू करतानाच इंडिगोकडून बंगळुरू आणि भोपाळ या दोन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अखेरपर्यंत इंडिगोकडून नाशिक विमानतळावरून सेवा दिली गेली नाही. सुरुवातीलाच इंडिगोने सेवा देण्यास नकार दिला होता, अशी माहितीही समोर येत आहे.

कंपन्यांना सर्वोत्तम सुविधा : एचएएलकडून विमान कंपन्यांना सर्वोत्तम सुविधा दिल्या जातात. नाइट लॅण्डिंगला पार्किंग मोफत असून, छोट्या फ्लाइटला लॅण्डिंगला कुठलेही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय फ्युएलचे दरदेखील कमी असल्याने, कंपन्यांचा खर्च कमी होतो.

दृष्टिक्षेपात विमानसेवा : 

– नाशिक विमानतळावरून 2020 मध्ये विमानसेवा सुरू
– दिल्ली, भोपाळ, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, बेळगाव, सिंधुदुर्ग या शहरांना जोडणारी सेवा
– या सर्वच शहरांसाठी केंद्राकडून विमान कंपन्यांना 50 टक्के सबसिडी
– स्पाइस जेट, इंडिगो, इण्डेन, स्टार एअर, एअर अलायन्स या विमान कंपन्यांशी करार
– प्रत्यक्षात स्पाइस जेट, स्टार एअर, एअर अलायन्स या तीनच कंपन्यांकडून सेवा सुरू
– इंडिगोकडून बंगळुरू आणि भोपाळ, तर स्टार एअरकडून सिंधुदुर्ग सेवा सुरूच केली नाही

हेही वाचा:

The post उडान योजना : सबसिडीचा मेवा तरीही बंद केली विमानसेवा appeared first on पुढारी.

Exit mobile version