उद्धव साहेब… आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द

नाशिकचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतील बंडानंतर रविवारी (दि.24) नाशिकसह सिन्नर, मालेगाव, इगतपुरी, भगूर येथील माजी नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, ‘साहेब… आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा शब्द दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीदेखील रस्त्यावरील लढाईबरोबरच कायद्याची लढाई लढावी लागणार आहे, त्यामुळे कामाला लागा अशा शब्दांत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नाशिकमधून मालेगावचे दादा भुसे आणि नांदगावचे सुहास कांदे या आमदारांनी बंड पुकारत जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पाडली. अनेक शिवसैनिकांमध्ये शिवसेना की शिंदेगट, असा संभ—म असल्याने, तो दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नाशिकमधील 31 माजी नगरसेवकांसह मालेगाव, सिन्नर, भगूर, इगतपुरी व जिल्ह्यातील इतर भागांतील पदाधिकार्‍यांनी मुंबईतील मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या सर्व शिवसैनिकांकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे शपथपत्रही लिहून घेण्यात आल्याचे समजते. या बैठकीतील एक व्हिडिओदेखील समोर आला असून, ज्यामध्ये नाशिकचे सर्व माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने घोषणा देताना दिसत आहेत.

दरम्यान, यावेळी नाशिकचे 32 आणि इतर असे एकूण 39 नगरसवेक उपस्थित होते. या सर्वांकडूनच प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. याप्रसंगी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, वसंत गिते, दत्ता गायकवाड, प्रशांत दिवे, प्रथमेश गिते, भागवत आरोटे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हा कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आले आहे.

नाशिकची शिवसेना एकसंध आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही. मात्र, कोर्टातील प्रक्रिया म्हणून लिहून दिले आहे. ज्यांना निवडून दिले ते गेले, मात्र ज्यांनी त्यांना निवडून दिले ते शिवसैनिक जागेवरच आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांची हीच खरी शिवसेना आहे, असे प्रतिज्ञापत्रात आम्ही लिहून दिले आहे.
– अजय बोरस्ते,
माजी विरोधी पक्षनेता

हेही वाचा :

The post उद्धव साहेब... आम्ही सर्व तुमच्यासोबतच, नाशिकच्या माजी नगरसेवकांचा शब्द appeared first on पुढारी.