उन्हाचा कडाका अन् वीज कट! शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होतेय पिकांची राखरांगोळी

चिचोंडी (जि. नाशिक) : अस्मानी संकटाचा मारा नुकताच झेललेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट कोसळले आहे. पाऊस गापपिट यासारख्या संकटांनंतर आता वीज वितरण कंपनीने मार्चएंडचे आपले वसुली टार्गेट पूर्ण करण्यासाठी ट्रान्सफाॅर्मर कट केले आहेत. दरम्यान आठ दिवसांत उन्हाचाही तडाखा वाढल्याने एक-दोन पाण्यावर आलेली कांदा पिके पाण्यावाचून होरपळत आहेत.

डोळ्यासमोर पिकांची राखरांगोळी

शेतातील उन्हाळ कांदा सध्या एक-दोन पाण्यावर आलेला असताना हा कांदा मानवनिर्मित संकटात सापडला आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमालीची वाढल्याने शेतातील कांदा पीक होरपळले आहे. काढणीयोग्य बनलेल्या या पिकाला मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे. थकीत वीजबिलांचे कारण पुढे करत केवळ मार्चएंडचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी परिसरातील अनेक ट्रान्स्फाॅर्मर वीज वितरण कंपनीने बंद केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या उन्हात ही पिके आता होरपळली जात आहेत.डोळ्यासमोर पिकांची राखरांगोळी होत असताना शेतकरी आता मेटाकुटीला व आर्थिक अडचणीत आला आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे आलेला नाही. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

शेतकरी रडकुंडीला आलेत..

आधीच बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना या वर्षीही संकटाचा सामना करावा लागत असून, वीज कट केल्याने शेततळ्यात व विहिरींना थोडेफार पाणी असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने पिके होरपळली आहेत. दुपारच्या वेळी पिकांची अवस्था पाहून शेतकरी रडकुंडीला आला आहे. एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेणार म्हणून सत्तेत विराजमान झाले. मात्र याच सत्तेतील सत्ताधाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या या समस्येकडे पाहायला देखील वेळ नाही, असे चित्र आहे. 

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...