उन्हाळी कांदालागवडीत यंदा ५ हजार हेक्टरने घट; पाऊस, वातावरणातील बदलाचा फटका

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : जिल्ह्यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून ते आजपर्यंत होत असेलेला सततचा वातावरणातील बदल अशा आस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदा रोपातून फेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदा लागवड पूर्ण केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाच हजार ८५० हेक्टरने कांदा लागवडीत घट झाली आहे. 

उत्पादन खर्चात मोठी वाढ

दोन वर्षांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे झुकला आहे. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झाले. अशातच शेतकऱ्यांनी महागडी औषधे व विविध खतांचा वापर करून काही प्रमाणत कांदा रोप वाचवून नोव्हेंबरमध्ये कांदा लागवड सुरू केली. मात्र जास्त पावसाने जमिनीत बुरशीचे प्रमाणात वाढल्याने लागवड केलेल्या कांदा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर रोटर फिरवून पुन्हा लागवडी केल्या. काहींनी मर नंतर वाफ्यात उरलेल्या कांद्यांकडे चांगले लक्ष दिले. मात्र यंदा सुरवातीपासूनच दोन दिवस ऊन तर, दोन दिवस ढगाळ वातावरण, अवकाळी, मोठ्या प्रमाणात दव, अशा बदलांमुळे कांद्यासाठी यंदा खर्चात मोठी वाढ झालेली आहे.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

सिन्नर तालुक्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ

चालू वर्षी जिल्ह्यातील बागलाण, देवळा, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झालेली आहे. उर्वरित दहा तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २९,९११ (तीस हजार हेक्टर) ने घट झाली आहे. बागलाण तालुक्यात यंदा सोळा हजार २०० हेक्टर लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मालेगाव तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजार ६७० हेक्टरने लागवडीचे क्षेत्र घटले आहे. 

अर्ली लागवडीत उत्पादनात घट शक्य 

जिल्ह्यात दिवाळीपर्यंत ७० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर जमिनीतील बुरशीमुळे मर रोग व जिल्ह्यात दोन वेळा अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे यामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. फेब्रुवारीपर्यंत न पडलेल्या चांगल्या थंडीमुळे अर्ली लागवडीतील उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तालुकानिहाय आकडेवारी हेक्टरमध्ये 

मालेगाव- १३२४३ 
बागलाण- ४६९०३ 
नांदगाव- २८२२ 
कळवण- २११२१ 
देवळा- १७५५१ 
दिंडोरी- १०६६ 
सुरगाणा- १४५ 
नाशिक- १८० 
त्र्यबंकेश्वर- १५ 
इगतपुरी- २३२ 
पेठ- १६३ 
निफाड- ८८८५ 
सिन्नर- ७९०० 
येवला- ११९५९ 
चांदवड- ९२९० 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

सततच्या बदलेल्या हवामानामुळे उन्हाळी कांद्याच्या सुरवातीच्या लागवडीवर विपरित परिणाम झाला आहे. मागील वर्षी कांद्याला मिळालेल्या बाजारभावामुळे काही तालुक्यात लागवड क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते. सटाणा तालुक्यात चालू हंगामात उपलब्ध पाण्याचा विचार करता शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते. 
- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव 

यंदा सुरवातीपासूनच खराब हवामानामुळे कांद्याची रोप शेतकऱ्यांना तीन ते चार वेळेस खराब झाले. त्यामुळे चार ते पाच हजार रुपये किलोने बियाणे खरेदी करावे लागले. त्यानंतर लागवड केलेल्या कांद्यातील मर अवकाळी पाऊस व धुक्यामुळे बुरशी करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यासाठी औषध फवारणीचा मोठा खर्च वाढला असून, चालू वर्षी कांदा उत्पादनाच्या खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. 
- अविनाश बिरारी, युवा कांदा उत्पादक शेतकरी, कंधाणे