उन्हाळ कांदालागवडीत पाच हजार हेक्टरने घट; वातावरणातील बदल कारणीभूत 

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस व लागवडीपासून आजपर्यंत होत असलेला सततचा वातावरणातील बदल अशा अस्मानी संकटाशी दोन हात करत वाचविलेल्या कांदारोपातून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एक लाख ४१ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील कांदालागवड पूर्ण केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाच हजार ८५० हेक्टरने कांदालागवडीत घट झाली आहे. 

जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस, अवकाळी, वातावरणातील बदल कारणीभूत 
दोन वर्षांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल कांदापिकाकडे झुकला आहे. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांदारोपांचे नुकसान झाले. अशातच शेतकऱ्यांनी महागडी औषधे व विविध खतांचा वापर करून काही प्रमाणात कांदारोप वाचवून नोव्हेंबरमध्ये कांदालागवड सुरू केली. मात्र जास्त पावसाने जमिनीत बुरशीचे प्रमाणात वाढल्याने लागवड केलेल्या कांदापिकात मररोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावर रोटर फिरवून पुन्हा लागवडी केल्या. काहींनी मरनंतर वाफ्यात उरलेल्या कांद्याकडे चांगले लक्ष दिले. मात्र यंदा सुरवातीपासूनच दोन दिवस ऊन, तर दोन दिवस ढगाळ वातावरण, अवकाळी, मोठ्या प्रमाणात दव अशा बदलांमुळे कांद्यासाठी यंदा खर्चात मोठी वाढ झालेली आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील बागलाण, देवळा, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झालेली आहे. उर्वरित दहा तालुक्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २९ हजार ९११ (तीस हजार हेक्टर)ने घट झाली आहे. बागलाण तालुक्यात यंदा १६ हजार २०० हेक्टर लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मालेगाव तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजार ६७० हेक्टरने लागवडीचे क्षेत्र घटले आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

अर्ली लागवडीत उत्पादनात घट शक्य 
जिल्ह्यात दिवाळीपर्यंत ७० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर जमिनीतील बुरशीमुळे मररोग व जिल्ह्यात दोन वेळा अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. फेब्रुवारीपर्यंत न पडलेल्या चांगल्या थंडीमुळे अर्ली लागवडीतील उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

तालुकानिहाय आकडेवारी हेक्टरमध्ये 
मालेगाव- १३,२४३ 
बागलाण- ४६,९०३ 
नांदगाव- २,८२२ 
कळवण- २१,१२१ 
देवळा- १७,५५१ 
दिंडोरी- १,०६६ 
सुरगाणा- १४५ 
नाशिक- १८० 
त्र्यबंकेश्वर- १५ 
इगतपुरी- २३२ 
पेठ- १६३ 
निफाड- ८,८८५ 
सिन्नर- ७,९०० 
येवला- ११,९५९ 
चांदवड- ९,२९० 

सततच्या बदललेल्या हवामानामुळे उन्हाळ कांद्याच्या सुरवातीच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. मागील वर्षी कांद्याला मिळालेल्या बाजारभावामुळे काही तालुक्यांत लागवड क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते. सटाणा तालुक्यात चालू हंगामात उपलब्ध पाण्याचा विचार करता शेतकऱ्यांचा कांदालागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते. 
-दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव 

 

यंदा सुरवातीपासूनच खराब हवामानामुळे कांद्याची रोपे तीन ते चार वेळेस खराब झाली. त्यामुळे चार ते पाच हजार रुपये किलोने बियाणे खरेदी करावे लागले. त्यानंतर लागवड केलेल्या कांद्यातील मर अवकाळी पाऊस व धुक्यामुळे बुरशी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यासाठी औषध फवारणीचा मोठा खर्च वाढला असून, चालू वर्षी कांदा उत्पादनाच्या खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. -अविनाश बिरारी, युवा कांदा उत्पादक शेतकरी, कंधाणे