उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत! देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : लाल कांद्याची घटलेली आवक व देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या दराला लाली चढली आहे. उन्हाळ कांद्याचे आगमन झाले असून, चार हजार ४०० रुपये असे आकर्षक दराने स्वागत झाले आहे. बिहार व पश्‍चिम बंगालमध्ये अद्याप उन्हाळ कांदा बाजारात आलेला नाही. त्यामुळे पिंपळगावच्या बाजारात कांदा चार हजार प्रतिक्विंटलच्या पुढे भाव खात आहे. 

उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत 
लाल कांद्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडील कांदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीतील आवक रोडावली आहे. दोन दिवसांपासून उन्हाळ कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी येऊ लागला आहे. सोमवारी (ता. २३) २५ जीप, ट्रॅक्टरमधून ५०० क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला. किमान दोन हजार ५००, कमाल चार हजार ४०० रुपये, सरासरी तीन हजार ७५१ रुपयांनी उन्हाळ कांद्याचे दर व्यापाऱ्यांनी पुकारले. उन्हाळ कांद्याच्या हंगामाचा श्रीगणेशा आकर्षक दराने झाला असताना लाल कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. ३५० वाहनांतून पाच हजार क्विंटल कांदा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आला. लाल कांद्याला किमान दोन हजार, कमाल चार हजार ४५५, तर सरासरी तीन हजार ९५१ रुपये दर मिळाला. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

पहिल्याच दिवशी ४,४०० रुपयांचा दर 
पिंपळगाव बाजार समितीत उच्चांकी दराबरोबरच चोख वजन व रोख पेमेंटमुळे जिल्हाभरात कांदा विक्रीला येत असल्याचे पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

पंधरा दिवसांत दर वाढतील... 
पटणा, कोलकता येथे रेल्वे रॅक सुरू झाल्या आहेत. एक्स्पोर्टला मागणी नसली तरी देशांतर्गत मागणी वधारली आहे. गुजरातमध्ये चार लाख गोणी (५० किलो प्रतिगोणी) अशी बंपर आवक असली तरी रोज ६० हजार गोण्यांचा लिलाव होत आहे. त्यामुळे पिंपळगावच्या कादा दरात उसळी आली आहे. मागणी वाढल्यास पंधरा दिवसांत कांद्याचे दर प्रतिक्विंटल पाच हजारांच्या जादुई दराला स्पर्श होईल, असा अंदाज कांदा व्यापारी अतुल शाह, सुरेश पारख, दिलीप मुथा यांनी व्यक्त केला.