उपचार सुविधा वाढविल्या पण ऑक्सिजन कुठयं? लिक्विड ऑक्सिजनची बोंबाबोंब कायम 

नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा प्रश्‍न तयार झाला असताना लिक्विड ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी टँकर उपलब्ध करून द्या, असे साकडे ऑक्सिजन उत्पादकांनी घातले होते. आताही साठवणूकक्षमता असताना लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीची व्यवस्था करा म्हणून उत्पादक घसा कोरडा होईपर्यंत सांगताहेत. पण त्यांचा हा आवाज सरकार सोडाच मात्र प्रशासनापर्यंत पोचला नाही. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनची बोंबाबोंब कायम राहिली आहे. त्याच्या झळा अर्थात, कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शुश्रूषेसाठी सुविधा वाढत असतानाही त्या सुरू करता येत नाहीत, असे विदारक चित्र पुढे आले आहे. 

लिक्विड ऑक्सिजनची बोंबाबोंब कायम 
पालकमंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी (ता. १३) रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुद्रावतार घ्यावा लागला. किंबहुना तशीच अवस्था आता ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने तयार झाली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिंदे-पळसे आणि सिन्नरच्या प्रकल्पाचा उपयोग ऑक्सिजन उत्पादन वाढविण्यासाठी करून घेण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही प्रकल्पांची पाहणी केली. त्यातील एक बंद असलेल्या प्रकल्पाची क्षमता दिवसाला पाचशे सिलिंडरची आहे. दुसऱ्या प्रकल्पात १३ हजार लिटरचा टँक आहे. हे प्रकल्प ताब्यात घेतल्यावर एक प्रश्‍न अनुत्तरित राहतोय. तो म्हणजे, या प्रकल्पांसाठी लिक्विड ऑक्सिजन कोठून आणणार? 

सव्वा टन ऑक्सिजनसाठी दारोदार 
नाशिक शहरात ऑक्सिजन खाटांची उपचार व्यवस्था उभी राहिली आहे. त्याची सुरवात करायची. त्यासाठी लागणाऱ्या सव्वा टन ऑक्सिजनसाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. शुश्रूषेला सुरवात करण्यासाठी सोमवारी (ता. १२) रात्रीपासून ऑक्सिजनचा शोध सुरू झाला. मंगळवारी पुन्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यासंबंधीची बैठक झाली. त्यातही लिक्विड ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने ऑक्सिजन देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली. उपचार व्यवस्थेसाठी पुण्याच्या पुरवठादाराने टँक बसविला. मग तो पुरवठादार ऑक्सिजन का देत नाही, या उत्पादकाच्या प्रश्‍नाला उत्तर मिळाले नाही. हे कमी काय म्हणून शहरातील एका रुग्णालयातर्फे कोरोना सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. हे सेंटर ऑक्सिजनच्या उपलब्धतेअभावी अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, नाशिकमधील दोन कंपन्यांना मंगळवारी दुपारी १५ ते १६ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाला असून, तिसऱ्या कंपनीने ३७ टन लिक्विड ऑक्सिजन आणला. हा ऑक्सिजन उपलब्ध झाला असला, तरीही शहर-जिल्ह्याची गरज भागू शकलेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या रोषाला यंत्रणेला सामोरे जावे लागले. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

‘सिव्हिल’चा पुरवठा टनाने वाढला 
जिल्हा सरकारी रुग्णालयाला दिवसाला तीन टन ऑक्सिजनची आवश्‍यकता भासायची. आता दिवसाला चार टन ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. तसेच मालेगावसाठी चारशे सिलिंडरभर ऑक्सिजन दिवसाला द्यावा लागतो. उपलब्धता आणि मागणीच्या तुलनेत अगोदर १० ते २० टन ऑक्सिजनची कमतरता भासत असताना आणखी ऑक्सिजन उपलब्ध कसा करून द्यायचा, असा प्रश्‍न उत्पादकांना भेडसावू लागला आहे. एवढेच नव्हे, तर सध्या पुरवठा होत असलेल्या रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा थांबविता येणार नाही. तसे केल्यास गुन्हा दाखल होण्याची भीती उत्पादकांमध्ये तयार झाली आहे.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात