उपनगरीय रेल्वेची दारे उघडा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी 

इगतपुरी शहर (नाशिक) : वकिलांना न्यायालयात वेळेवर कामकाज सुरू करता यावे, यासाठी दररोज सकाळी आठ ते अकरा या गर्दीच्या वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली. तर सामान्य प्रवासी हा देखील कामावर जाण्यासाठीच लोकलचा वापर करतो. यामुळे आता गर्दीचे कारण पुढे करून आणखी प्रतीक्षा करायला न लावता सरकारने सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय लवकर घ्यावा, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी मांडली आहे. 

रुग्णांसह नातेवाइकांना प्रवास परवडेना

कोरोना वगळता कर्करोग, टीबी, डायलिसिस अशा खर्चिक आजारांवरील उपचारांसाठी इगतपुरी, कल्याण, कसारा, बदलापूर, पालघर येथील नागरिकांना मुंबईतील रुग्णालयात यावे लागते. रुग्णांसह नातेवाइकांना रस्तेमार्गे प्रवास परवडत नाही. वाहतूक कोंडीत रुग्ण दगावण्याची भीती अधिकच असते. यामुळे सरकारने विनाविलंब सर्वांसाठी लोकल सुरू करावी, असे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र लोकल खुली झाल्यास सुरक्षित वावराचे नियम पाळणे शक्य होणार नाही, असे राज्य सरकारमधील सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सांगतात. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

नाशिक ते पडघा या महामार्गावर आजही अनेक ठिकाणी खड्डे बुजविले गेले नाहीत. कसारा घाटातील रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षापासून केलेच नाही. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचा रस्तेमार्गे प्रवास दिवसेंदिवस अधिकच कष्टप्रद, खर्चिक आहे. वाहतूक कोंडीही जैसे-थे आहे. याचा फटका सामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो. 

मर्जीतील लोकांसाठी धोरण? 

वकील, पत्रकार, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी, महापालिका, रेल्वे पोलिस, आरोग्य, सफाई कर्मचारी अशा १७ गटांतील प्रवाशांना सध्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मुभा आहे. सुमारे ९० टक्के लोकल फेऱ्यांमधून अवघे १० टक्के प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा प्रवासी महासंघाने केला आहे. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

 

सकाळी गर्दीच्या वेळेत मर्जीतील प्रवासी वर्गाला प्रवेश देण्याचे धोरण रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरूच आहे. नऊ महिन्यांपासून सर्वांसाठी बंद असलेल्या लोकलचे दरवाजे प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी खुले करावेत. 
-नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी एकता महासंघ