उपासमार ओढावण्याऐवजी जबाबदारी ओळखा; महापालिका आयुक्तांचे नाशिककरांना आवाहन 

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसाराचे प्रमाण सात ते आठपटींनी अधिक आहे. परंतु या काळात लॉकडाउन करणे परवडणारे नाही. अधिकारी म्हणून शहराच्या आरोग्याबरोबरच अर्थचक्र सांभाळायचे आहे. त्या मुळे नाशिककरांनी जबाबदारी ओळखावी. स्वतःसह इतरांसाठी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले. 

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिककरांशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांत कोरोना नियंत्रणात आला. जानेवारीत कोरोना प्रादुर्भाव संपुष्टात आल्याची परिस्थिती होती. अर्थचक्रदेखील पूर्वपदावर आले होते. मात्र लग्न कार्य, सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन केले नाही. परिणामी, फेब्रुवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला. फेब्रुवारी व मार्चच्या पाच आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या आठ ते दहा पटीने वाढली आहे. ही बाब चिंताजनक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाउन केल्यास अर्थचक्र पुन्हा कोलमडून पडेल. त्यात सर्वाधिक हाल मध्यमवर्गीय, गोरगरीब, कामगारांचे होतील. हे टाळण्यासाठी प्रशासनाला कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नका. त्याऐवजी नाशिककरांनीच स्वतःची जबाबदारी ओळखून शिस्त पाळणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येकाने ‘मी जबाबदार नाशिककर’ शपथ घेण्याचे आवाहन करताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली, त्रिसूत्रीचे पालन केले तर कोरोनावर आपण पुन्हा मात करू, असा आशावाद व्यक्त केला. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

काय म्हणाले आयुक्त? 

- जबाबदारी नाशिककर म्हणून शपथ घ्या. 
- आरोग्य व अर्थचक्राचे संतुलन राखणे कर्तव्य. 
- मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर त्रिसूत्रीचे पालन करा. 
- शनिवारी, रविवारी हॉटेलमधील गर्दी टाळा. 
- बाजारपेठ, भाजी मार्केटमध्ये गर्दी करू नका. 
- घरपोच भाजीपाला मागवा. 
- महापालिकेच्या नाशिक बाजार ॲपद्वारे घरपोच किराणा, भाजीपाला मागवा. 
 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा