उर्दू दिवस : ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा’

urdu din www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘सारे जहाँ से अच्छा…’ या देशभक्तीपर गीताचे लेखक व उर्दू भाषेतील महान कवी अल्लामा इकबाल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केला जाणार्‍या जागतिक उर्दू दिनानिमित्त शहरातील उर्दू शाळेसह काही कार्यालयांमध्ये उर्दू दिन साजरा करण्यात आला. शहरातील सर्वांत मोठी व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या युज नॅशनल परिसरात दिवाळीनंतर शाळेचा पहिला दिवस उर्दू दिनाच्या कार्यक्रमांनी भरून गेला होता. याप्रसंगी उर्दू भाषेतील गीते, कविता, गझल व एकापेक्षा एक शेरो शायरी विद्यार्थ्यांनी सादर केली. शिवाय मनपा व जिल्हा परिषद अंतर्गत चालविल्या जाणार्‍या उर्दू शाळांमध्येही उर्दू दिनानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. फैज बँकेतही नवनियुक्त संचालकांनी यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 9 नोव्हेंबर जागतिक उर्दू दिवसाच्या पार्श्वभूमीवर उर्दूप्रेमींनी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा केला.

भारतात सर्वाधिक उर्दू भाषिक…
‘उर्दू‘ ही भारतात एक नोंदणीकृत भाषा असून, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे. जागतिक स्तरावर उर्दू भाषा बोलणारी सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.

..हेे गीत बनले निषेधाचे प्रतीक
अल्लमा मोहम्मद इकबाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा’, हे गीत भारतीय स्वतंत्रता संग्रामादरम्यान ब्रिटिश शासन निषेधाचा प्रतीक बनले होते. स्वातंत्र्य संग्रामामधील क्रांतिकारी लाला हरदयाल यांनी 1905 मध्ये इकबाल यांना एका कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी भाषण करण्याऐवजी अल्लामा इकबाल यांनी हे देशभक्तीपर गीत सादर केले होते. अल्लामा इक्बाल एक महान उर्दू कवी आणि विचारवंत होते. आपल्या आत्म-संकल्पनेतून त्यांनी उपखंडातील तरुणांमध्ये नवसंजीवनी दिल्याचे काम केले होते.

हेही वाचा:

The post उर्दू दिवस : ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा’ appeared first on पुढारी.