ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून नागरिकांची फसवणूक? गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे निवेदन 

नाशिक : कोरोना काळात प्रत्यक्षात विज वापराचे रिडींग न घेता सरसकट तिप्पट दर आकारणी करून नागरिकांना बिले पाठविली गेली त्यानंतर पुन्हा वजावट करण्याचे आश्‍वासन दिले परंतू अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह उर्जा सचिव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हादाखल करावा या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना देण्यात आले. 

महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे निवेदन 
कोरोना महामारीमुळे चार महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्या काळात वीज मिटर रिडिंग न घेता देयके वितरित करण्यात आली. वापरपेक्षा तिप्पट-चौपट दराने देयके पाठवल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. टाळेबंदी, कामगार कपात, बेरोजगारीमुळे उत्पन्न घटल्याने वीज बिले अदा करणे अशक्य होते. मनसेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार देण्यात आली. वीजबिलात कपातीचे आश्‍वासन देण्यात आले. परंतू याउलट ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल भरावेच लागेल अशी सक्ती केली. नागरिकांची फसवणुक झाल्याच्या विरोधात मनसेच्या वतीने शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये संगनमताने गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

प्रमुख नेते गायब 
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये निवेदन देताना संघटनेतील दुसया फळीतील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदनावर डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, नगरसेवक सलिम शेख, योगेश शेवरे, नंदिनी बोडके, वैशाली भोसले आदींच्या स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात आला असला तरी निवेदन देताना यापैकी कोणीचं नेते उपस्थित नसल्याने दुसया फळीने सरकार विरोधातील किल्ला लढविल्याचे दिसून आले. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच