ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही : संजय राऊत

संजय राऊत

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीतल्या सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर लादलेले संकट दूर करण्यासाठी पुन्हा एकदा भवानी तलवार हाती घ्यावी लागणार आहे. मराठी माणूसच दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा हादरा दिल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील निहाळे येथील श्री बुवाजी बाबा मंदिराच्या कमानीचे लोकार्पण खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, महंत बुवाजी बाबा पुणेकर, अहिलाजी पुणेकर, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, बी. आर. चकोर, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, संजय सानप, मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, उपसरपंच विष्णू सांगळे, चित्रा सांगळे आदी उपस्थित होते.

शांततेची मला सवय नाही. बुवाजी  बाबांच्या मंदिरात प्रवेश केला, तेव्हा हर हर महादेवची गर्जना ऐकायला मिळाली. ३५० वर्षांपूर्वी याच गर्जनेने दिल्लीतल्या सत्ताधीशांचा माज उतरवला होता. वर्तमान स्थितीत महाराष्ट्राचा आवाज असलेली हीच गर्जना दिल्लीत घुमली पाहिजे, असे आवाहन करीत खासदार राऊत यांनी नामोल्लेख टाळून पंतप्रधान नरेंद्री मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रासह, पक्ष आणि माझ्यावर वारंवार संकटे येत आहेत. त्या संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा बुवाजी बाबांच्या दर्शनाने मिळाली असल्याचे खा.. राऊत म्हणाले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माथा टेकवून ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही

मनोभावे माथा टेकवून ऊर्जा देणारी बुवाजी बाबांसारखी देवस्थाने या महाराष्ट्रात आहेत. या देवस्थानांमध्ये श्रद्धेचा कुठलाही बाजार मांडला जात नाही. भव्य दिव्य मंदिरे, उंच घुमट हाच खरा महाराष्ट्र असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले. तसेच आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही, रेडे शोधायची गरज नाही, कोणाकडे हात दाखवून भविष्य बघायची गरज नसल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला हाणला.

हेही वाचा : 

The post ऊर्जा देणारी देवस्थाने महाराष्ट्रात, गुवाहाटीला जायची गरज नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.