एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

गिरीश महाजन

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मंत्री असताना एकनाथ खडसेंनी चुकीचे कामे केली असून, त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. आता एकनाथ खडसेदेखील भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली.

जळगावात भाजप कार्यालयातील कार्यक्रमासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार आहे. या प्रकरणावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.

या वेळी महाजन म्हणाले की, भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे. त्यामुळे खडसेंची जेलवारी अटळ आहे. भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळत नाही. बोगस कंपन्या स्थापन करून यांनी पैसा वळविला आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने कोणतीही ॲक्शन घेऊ नये, असे सूचित केले आहे. ते हटल्यानंतर लगेच खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल, असेही महाजन म्हणाले.

चौकशी समितीला पुरावे दाखवा

‘आम्ही त्यांना जेलमध्ये टाकतोय’ या एकनाथ खडसेंच्या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही चौकशी समितीला सामोर जावून पुरावे दाखवा, तुमच्‍याकडे पुरावे नसतील तर कारवाई होईल, असेही महाजन यांनी सांगितलं. एकनाथ खडसेंविरोधात कारवाईत कुठल्याप्रकारे सत्तेचा गैरवापर नाही, त्यांच्या विरोधातील तक्रारी या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत. मात्र, गेल्या काळात त्‍यांचं सरकार असल्याने या तक्रारी दबल्या गेल्या होत्या. आता चौकशीत त्यात स्पष्टता येईल आणि कोण स्वच्छ आहे, कोणाचे हात बरबटले आहेत, ते सुध्दा समोर येईल, असेही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

खडसेंना क्लीन चिट नाही

भोसरी गैरव्यवहार प्रकरणात खडसेंना न्‍यायालयाने  क्लीन चिट दिलेली नाही. झोटींग अहवाल सुद्धा सर्वांसमोर आहे, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले. तुम्ही म्हणत असाल तर झोटींग अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यास मुख्यमंत्र्यांना सांगेन, असं आव्हानही एकनाथ खडसेंना गिरीश महाजन यांनी दिलं. राज्यात दुसरे संजय राऊत म्हणजे, एकनाथ खडसे असल्याची टीका महाजन यांनी केलीय. जे काय आहे, ती स्पष्टता ईडीसमोर द्यावी, असेही महाजन म्हणाले.

हेही वाचलंत का? 

The post एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा appeared first on पुढारी.