एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु

एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले असून, चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याने या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असे विखे-पाटलांनी जाहीर केले होते. मुक्ताईनगर तालुक्यात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मुक्ताईनगर तालुक्यात सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमिनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आमदार खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान केल्याचा आरोप केला.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकाऱ्यांनी याला तत्काळ शेतीसाठी परवानगी दिली. शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. तेथे १० हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र, येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा :

The post एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु appeared first on पुढारी.