एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी ‘त्यांनी’ दिला परंपरेला फाटा; बंद काळात माणुसकीचे दर्शन 

सिडको (नाशिक) : असं म्हटले जातं, की मनुष्य आयुष्य जगत असताना त्याचं अर्ध आयुष्य हे रांगेत नंबर लावण्यातच जातं. परंतु आयुष्य संपल्यानंतरही त्याला रांगेत उभ रहावं लागेल, असे कधी कुणालाही स्वप्नात वाटलं नसेल; परंतु या कोरोनाच्या महामारीत तेदेखील बघायला मिळाले. अशीच काहीशी घटना या दोन दिवसांच्या लॉकडाउन काळात सिडकोतील मोरवाडी अमरधाममध्ये बघायला मिळाली. एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोन कुटुंबांनी रीतिरिवाज, परंपरेला बाजूला सारत माणुसकीचे दर्शन घडविले. 

नेमके काय घडले?

शनिवारी (ता. १३) संपूर्ण शहरात प्रशासनाने बंद जाहीर केला होता. नेमके याच दरम्यान हनुमान चौकातील एका वृद्ध महिलेचे आकस्मित निधन झाले. याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी प्रथम पंचवटी, नंतर मोरवाडी अमरधाममध्ये नंबर लावला. परंतु दोन्ही ठिकाणी वेटिंगवर राहण्यास सांगितले. त्या मुळे कुटुंबीय व मित्रपरिवाराची धावपळ उडाली. थेट मोरवाडीतील अमरधाममध्ये धाव घेत त्यांनी सत्यस्थिती डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितली. तर खरोखर चारही बेड हाउसफुल असल्याचे बघायला मिळाले. सर्वत्र बंद असल्याने व मृतदेह जास्त वेळ घरात ठेवता येत नसल्याने, अंत्यसंस्कार लवकर होणे गरजेचे होते. त्या मुळे अमरधाममधील एका बेडवर नुकतेच अग्निडाग देऊन झालेल्या मृतदेहाच्या नातेवाइकांना संबंधितांनी गाठले व हातपाय जोडून त्यांना राख सावरण्याची विनंती केली. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

माणुसकी अजूनही जिवंत 

हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे राख थंड झाल्याशिवाय ती सावरता येत नाही, म्हणूनच शोकसंदेशात राख सावरण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी असल्याचे नेहमी सांगितले जाते. परंतु संबंधित कुटुंबातील सदस्यांनी रीतिरिवाज बाजूला सारात व अडचण लक्षात घेत, थंड न झालेली राख सावरून माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केल्याचे बघायला मिळाले. शेवटी विधिवत त्या मृत वृद्ध महिलेच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांनी अंत्यसंस्काराचे सोपस्कार शांततेत पार पाडला. माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या या घटनेची चर्चा मात्र परिसरात चांगलीच चर्चिली गेल्याचे बघायला मिळाले. 

संबंधित घटनेतून कवी सुरेश भट यांच्या, ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते’, ही रचना आठवल्याशिवाय राहात नाही. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

हनुमान चौकातील मंगला घोडके (वय ७२) यांचे शनिवारी (ता. १३) आकस्मित निधन झाले. शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नव्हती. मोरवाडीत नुकतेच अंत्यसंस्कार झालेल्या एका कुटुंबातील सदस्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ती जागा राख सावरून उपलब्ध करून दिली. तेव्हा कोठे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 
-बाळासाहेब गिते, सामाजिक कार्यकर्ते