
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठाकरेनेते संजय राऊतांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर छोटा मच्छर अशी टीका केल्यानंतर गोडसेंनी राऊतांना अभिनेता नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर चित्रपटातील संवादाची आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर टीका करण्यापेक्षा आम्ही कामातून उत्तर देऊ आणि याच छोट्या मच्छरने एकही मारा सॉलीड मारा, असे सांगत ठाकरे गटातून ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशाकडे लक्ष राऊतांचे लक्ष वेधले.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण असून, येत्या काही दिवसात ठाकरे गटातील आणखी काही पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. प्रवेश सोहळ्यानंतर गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राऊत यांच्यामुळे शिवसेना दुभंगली असून, उध्दव ठाकरे यांनी आता तरी दखल घ्यावी आणि आत्मपरिक्षण करावे. राऊत यांना सकाळी झोपेतून उठून कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मी माझ्या निधीतून कॅमेरे खरेदी करून देणार असल्याचा टोमणा गोडसे यांनी लगावला. माजी नगरसेवक प्रविण तिदमे आणि दादा भुसे यांचे समर्थक श्यामकुमार साबळे वगळता ठाकरे गटाचा एकही माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागला नव्हता. आता मात्र ठाकरे गटाचे ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाकडून ठाकरे गटावर शरसंधान साधले जात आहे.
ठाकरे गटाच्या आजच्या स्थितीला केवळ राऊत हेच कारणीभूत आहेत. दलाली कोण करत हे संपूर्ण नाशिककरांना माहित आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करून ठाकरे गट भरकटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी पुन्हा युती करून बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार जागा ठेवत शिवसेनेला नव्याने उभारी दिली सअनू, त्याच विचाराला अनुसरून ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
कडवट शिवसैनिक धडा शिकवतील
शिवसेना संपविण्याची काहींनी सुपारी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डाव हाणून पाडला आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सोबत घेऊन शिवसेना वाढविण्यासाठी सर्व शिवसैनिक एकत्र आले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना समजून घेण्याऐवजी त्यांचे श्राध्द घालण्याची भाषा करणाऱ्यांना बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो हे कडवट शिवसैनिक येत्या काळात दाखवून देतील, असा इशारा शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी दिला आहे.
हेही वाचा:
- खासदार संजय राऊत : सर्वांचा हिशेब २०२४ मध्ये चुकता करणार
- ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या
- देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सवर जाईल : नितीन गडकरी
The post एकही मारा सॉलीड मारा… खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार appeared first on पुढारी.